स्वस्तात ट्रॅक्टर खरेदीचा मोह पडला महागात; पोलिसांनी एकास ठोकल्या बेड्या
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: September 30, 2023 06:36 PM2023-09-30T18:36:50+5:302023-09-30T18:37:20+5:30
चोरीला गेलेले ट्रॅक्टर शोधण्यात पोलिसांना यश
हिंगोली : चोरीचे स्वस्तात मिळणारे ट्रॅक्टर हेड व ट्रॉली खरेदी करणे एकास चांगलेच महागात पडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वर्षापूर्वी चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेऊन आरोपीस बेड्या ठोकल्या.
सेनगाव येथील सुभाष सोनटक्के यांनी त्यांच्या दुकानासमोर उभे केलेले ६ लाख ४५ हजार रूपये किमतीचे ट्रॅक्टर हेड व ट्रॉली चोरट्यांनी १९ मे २०२१ रोजी चोरून नेले होते. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. दरम्यान, चोरी गेलेले ट्रॅक्टर ज्ञानेश्वर पुसराम दवंडे (रा. सातोना ता. परतूर जि. जालना) याचे ताब्यात असून तो सेनगाव हद्दीतील येलदरी तांडा येथे आला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या पथकाने येलदरी तांडा गाठून ज्ञानेश्वर दवंडे यास ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यात असलेल्या ट्रॅक्टरबाबत विचारणा केली असता हे ट्रॅक्टर चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले. तसेच दोन वर्षापूर्वी शेख रहिम उर्फ शेरा शेख चाँद (रा. परभणी) व अन्य दोघांकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी ट्रॅक्टर हेड व ट्रॉली असा एकूण ६ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हुळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, माधव शिंदे, हरिभाऊ गुंजकर, तुषार ठाकरे, दिपक पाटील यांच्या पथकाने केली.