दोघे सख्खे भाऊ पक्के गुंड; दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: January 8, 2024 05:37 PM2024-01-08T17:37:59+5:302024-01-08T17:43:19+5:30
संघटीतपणे गुन्हे करीत असल्याने त्यांच्यावर हद्दपारीची कार्यवाही
हिंगोली : वसमत तालुक्यातील बहिरोबा चोंढी येथील दोन सख्खे भाऊ दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
विजय पांडुरंग नरवाडे (वय २६), अजय पांडुरंग नरवाडे (वय २५ दोघे रा. बहिरोबा चोंढी ता. वसमत) अशी हद्दपार करण्यात आलेल्या भावांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध कुरूंदा व वसमत शहर पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसून ते संघटीतपणे गुन्हे करीत होते. त्यामुळे त्यांच्यावर हद्दपारीची कार्यवाही करावी असा प्रस्ताव कुरूंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जी.के. मोरे यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची पडताळणी करून जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये विजय नरवाडे व अजय नरवाडे या दोघांनाही दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबतचे आदेश काढले आहेत.