हातमालीच्या ग्रामसुरक्षा दलाने चार चोरट्यांना पिटाळले
By विजय पाटील | Published: July 27, 2023 06:21 PM2023-07-27T18:21:41+5:302023-07-27T18:21:59+5:30
कळमनुरी पोलिस ठाण्यात तरुणांचा सत्कार
हिंगोली : मध्यरात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने गावात शिरलेल्या चार चोरट्यांना ग्रामसुरक्षा दलाने पाठलाग करीत पिटाळून लावल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील हातमाली येथे २७ जुलै रोजी घडला. ग्रामसुरक्षा दलाच्या कामगिरीबद्दल कळमनुरी पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.
हातमाली येथील वीस तरुणांनी पुढाकार घेत ग्रामसुरक्षा दलाचे काम सुरू केले आहे. तरुण मंडळी दररोज आळीपाळीने रात्री गावात गस्त घालतात. २७ जुलै रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य श्रीकांत भोयर, गजानन भोयर, शिवशंकर भोयर, शिवाजी फिस्के गस्त घालत होते. त्यावेळी गावात चौघे जण संशयीतरीत्या फिरताना निदर्शनास आले. ग्रामसुरक्षा दलातील तरुणांनी त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता संशय वाढला. त्यामुळे तरुणांनी आरडाओरड करीत ग्रामस्थांना जागे केले.
यादरम्यान मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. हा प्रकार कळमनुरी पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे पथकासह हातमाली येथे पोहोचले. तोपर्यंत मात्र चोरटे पळून गेले होते.
ग्रामसुरक्षा दलाच्या या कामगिरीबद्दल तरुणांचा कळमनुरी ठाण्यात पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी सत्कार केला. यावेळी मंगेश भोयर, दत्तराव भोयर, दत्ता भोयर, संदीप भोयर, बालासाहेब भिसे, आकाश हनवते, किशन खराटे, मारोती भोयर, देवानंद पवार, राजा खंदारे, विश्वनाथ भोयर, राजू अंभोरे, जितेश भिसे, दिगांबर भिसे, क्रिष्णा भोयर, राजू पेंढारकर आदींची उपस्थिती होती.