पणन मंडळाच्या केळी प्रक्रिया केंद्रात ५ लाखांच्या साहित्यांची चोरी; गुन्हा नोंदविण्यास लागले पाच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 12:35 PM2021-06-23T12:35:16+5:302021-06-23T12:38:07+5:30
वसमत येथे पणन मंडळाचे मालकीचे केळी प्रक्रिया आणि निर्यात केंद्र आहे. पणनचे केंद्र उभे राहिले मात्र त्याचा वापरच होत नाही.
वसमत ( हिंगोली ) : येथील पणन मंडळाच्या मालकीचे असलेल्या केळी प्रक्रिया केंद्रातील विद्युत डीपीतील तांब्याची तार आणि ऑईल असा पाच लाख 23हजार 396रू चा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे . 17 जून रोजी घडलेल्या प्रकरणी 22 जूनच्या रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे
वसमत येथे पणन मंडळाचे मालकीचे केळी प्रक्रिया आणि निर्यात केंद्र आहे. पणनचे केंद्र उभे राहिले मात्र त्याचा वापरच होत नाही. वीज नाही म्हणून कोट्यवधीच्या मशीन आणि साहित्य वापराअभावी पडून आहे. सध्या हे केंद्र हळद साठवणीसाठी सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने चालविण्यास घेतलेले आहे. या केंद्रातील विद्युत जनित्र पणन मंडळाच्या मालकीचे आहे. 17 जून च्या रात्री या जनित्रला जमिनीवर पाडून त्यांतील तांब्याची तार आणि ऑईलची चोरी करण्यात आली. चोरट्यांनी एकूण पाच लाख 23हजार 396 रुपयांचे साहित्य चोरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी 22 जूनच्या रात्री वसमत शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रल्हाद रामराव बोरगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे हे करत आहेत. दरम्यान, पणन मंडळाच्या मालकीच्या केंद्रातील ही चोरी चर्चेचा विषय झाली आहे
गुन्हा नोंदवण्यास पाच दिवस
शासकीय मालमत्ता असलेल्या केळी प्रक्रिया केंद्रात 17जून रोजी अजब चोरी झाली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात तब्बल पाच दिवसाचा वेळ गेला. गुन्हा लगेच दाखल झाला असता तर तपास लगेच सुरू होऊ शकला असता. परंतु, गुन्हा दखल करण्यात वेळ लागला. या मागील कारणांचाही तपास होण्याची गरज आता व्यक्त होत आहे. महाकाय डीपी जमिनिवर काढून त्यातील साहित्य लांबणार चोरटे हे या कामातील तज्ञाच असावेत असा अंदाज आहे. आता तपास कसा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे