...तर हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होईल; कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 01:01 PM2020-03-04T13:01:29+5:302020-03-04T13:04:26+5:30
गोदावरी खोरे महामंडळाकडून आणला जात आहे प्रस्ताव
हिंगोली : तालुक्यातील खरबी येथून बोगद्याद्वारे कयाधू नदीचेपाणी पैनंगगा नदीत सोडण्याचा प्रस्ताव गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून आणला जात आहे. त्यास हिंगोली जिल्ह्याचा विरोध असून हा प्रकार म्हणजे हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी खा. अॅड. शिवाजी माने यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे बैठकीला येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जात आहे. याद्वारे १0९ दलघमी पाणी कयाधूतून इसापूर धरणात सोडले जाणार आहे. इसापूर धरणाचा हिंगोली जिल्ह्याला काहीच फायदा होणार नाही. १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा आता महामंडळाचा प्रस्ताव आहे. त्याची किंमत ५१३ कोटी रुपये आहे. पूर्वी इसापूर व सापळी धरणाला १९६८ मध्ये एकत्रित मंजुरी दिली होती. तेव्हा ३५ कोटीत होणारा हा प्रकल्प २00५ मध्ये ३५५0 कोटींचा झाला होता. आता तो कोणत्याही परिस्थितीत रास्त नाही. मात्र कयाधू नदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर त्याचा परिणाम होईल. हे पात्र कोरडे होईल. या भागातील नियोजित बंधाऱ्यांना पाणी मिळणार नाही. आधीच पाच उच्च पातळी बंधारे प्रस्तावित असून हिंगोली जिल्ह्याचा वेगळा अनुशेष मंजूर झाला तरीही त्यांचा प्रश्न सुटला नाही.
यापूर्वी मेंढेगिरी लवादानेही जिल्ह्यासाठी १0८ दलघमी पाणी आरक्षित केले असून त्याचेही कोणतेच नियोजन महामंडळाने केलेले नाही. मात्र हा नवा प्रस्ताव आणून महामंडळ हिंगोली जिल्ह्याच्या विरोधात भूमिका घेत असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.