...तर देणार जशास तसे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:02 AM2018-11-28T01:02:37+5:302018-11-28T01:03:15+5:30
जिल्हा परिषद सदस्य आमदार-खासदारांच्या कामांमध्ये ढवळा-ढवळ करणार नाहीत. मात्र त्यांनी केल्यास खपवूनही घेणार नाहीत. पक्षभेद सोडून अशावेळी सर्वजण एकजूट दाखवून जि.प.सदत्वाचा धर्म पाळत जशास तसे उत्तर देतील, असे आज जि.प.त झालेल्या बैठकीत ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषद सदस्य आमदार-खासदारांच्या कामांमध्ये ढवळा-ढवळ करणार नाहीत. मात्र त्यांनी केल्यास खपवूनही घेणार नाहीत. पक्षभेद सोडून अशावेळी सर्वजण एकजूट दाखवून जि.प.सदत्वाचा धर्म पाळत जशास तसे उत्तर देतील, असे आज जि.प.त झालेल्या बैठकीत ठरले.
हिंगोली जिल्ह्यात वरिष्ठ लोकप्रतिनिधींचा जि.प.मध्ये हस्तक्षेप वाढत चालल्याने सदस्यांमध्ये नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी तर आमदारांच्या स्वीय सहायक व अध्यक्षांच्या गटांतच जुंपली होती. एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या या प्रकारामुळे इतर सदस्यांची गोची होत आहे. त्यामुळे सर्वच सदस्यांनी आपापल्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींना विनंती करून असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तर जि.प.सदस्यांपैकीही कुणी चुकीचे वागू नये, असेही सांगण्यात आले. आपणहून कुणाच्या सन्मानाला ठेच पोहोचेल असे वागायचे नाही. मात्र तरीही समोरून वार झाला तर गप्प बसायचे नाही, असा एकमुखी ठरावच सदस्यांनी घेवून टाकला. विशेष म्हणजे सर्वपक्षीय सदस्यांनी त्याला दाद दिली. एवढेच नव्हे, तर प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य घेवून एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात एका अपक्षालाही स्थान देण्यात येणार आहे.
मागील वर्षभरात जिल्हा परिषदेत वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे विविध कामांचा निधी ठप्प पडला आहे. त्यामुळे हा निधी आता खर्च न झाल्यास जि.प.चे नुकसान होणार आहे. यासंदर्भात वेळीच निर्णय घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तर यंदाच्या विविध योजनांच्या निधीचे नियोजन वेळेत करून आचारसंहिता लागण्यापूर्वी ही कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना गतवर्षीचा निधी खर्ची पडला नाही अन् यंदाच्याचे नियोजन नाही. या प्रकारामुळे जि.प. सदस्यांनाही मतदारसंघात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या वरिष्ठांना याचे गांभिर्य लक्षात आणून देण्याचे काम नव्याने स्थापन होणाऱ्या समितीवर सोपविले जाणार आहे.
आज झालेल्या बैठकीत सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. आवश्यक तेथे नरमाईचे धोरण घेताही येईल. मात्र काळ सोकावणार असेल तर अशा बाबींमध्ये कणा मोडला तरीही चालेल बाणा सोडायचा नाही, असा एकंदर सूर होता.