सांगूनही सुधारणा नाही; हिंगोली जिल्ह्यातून सहा जण तडीपार!
By रमेश वाबळे | Published: November 16, 2023 06:51 PM2023-11-16T18:51:56+5:302023-11-16T18:52:42+5:30
तिघे एक वर्षासाठी तर अन्य तिघे दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार
हिंगोली : प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होत नसल्याने तिघांना एक वर्षासाठी तर तिघांना दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आदेश निर्गमित केले.
जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून हिंगोली शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत समाजात तेढ निर्माण करण्यासह गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, सतत गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.
मात्र, त्याउपरही गुन्हे करण्याची वृत्ती सुरूच असलेल्यांविरुद्ध हद्दपारीचा हा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडून उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरणे तसेच समाजासाठी धोकादायक बनलेले संतोष विठ्ठल खेळके, राहुल संजय काळे, अनिल ऊर्फ बंट्या श्यामराव गाडे (तिघे रा. हिंगोली) या तिघांना एक वर्षासाठी तर बंडू निवृत्ती कन्हेरकर, मंगेश शिवाजी डोल्हारे (दोघे रा. इंचा ता. हिंगोली), दीपक बाजीराव कऱ्हाळे (रा. डिग्रस कऱ्हाळे) या तिघांविरुद्ध दोन वर्षांसाठी हद्दपारचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.