‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; सेनगावात धरणाशेजारील गावेच दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 07:07 PM2018-10-11T19:07:25+5:302018-10-11T19:10:54+5:30

सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही.

'There is no use of dam,to nearer land'; The villages near the dam in Sengawa are in drought-prone areas | ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; सेनगावात धरणाशेजारील गावेच दुष्काळाच्या छायेत

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’; सेनगावात धरणाशेजारील गावेच दुष्काळाच्या छायेत

Next

सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाजवळील गावांना या धरणाचा सिंचनासाठी काहीही फायदा होत नाही. पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून धरण जवळ असूनही सिंचनासाठी त्याचा उपयोग होत नसल्याने परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

सिध्देश्वर धरणाजवळील पुसेगाव, खुडज, गोंडाळा, खिल्लार, आडोळ, जामदया, जांभरुण आंध, जांभरुन तांडा, आहेरवाडी, वरुड, समद, वरुड काजी, रिधोरा, जांभरुण रोडगे, पार्डी, पहेणी, रेपा, लिंग पिंपरी आदी गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाचा काहीच फायदा होत नाही. धरणाच्या मोठ्या कालव्याद्वारे वसमत आणि नांदेडच्या शेतकऱ्यांनाच सिंचनासाठी फायदा होत असल्याने ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशीच काहीशी स्थिती परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.

पावसाने गत दोन महिन्यांपासून दडी दिल्याने खरीप हंगाम पाण्याअभावी पूर्णपणे वाया गेला. धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळाले असते तर खरीप हंगाम वाचवता आला असता ही आशा व्यक्त केल्याशिवाय  येथील शेतकऱ्यांना कोणताच पर्याय उपलब्ध नाही. परिसरात कोरडवाहू व माळरान शेतीचे क्षेत्रफळ मोठे आहे. ओलिताखाली कमीच क्षेत्र आहे.

सिध्देश्वर धरण झाल्यानंतर शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा लाभ होईल अशी आशा होती, मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही आशाही फोल ठरली. सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रकल्पाजवळील गावांना या धरणाचा फायदा होण्याऐवजी नांदेड, वसमत, हट्टा, जवळा बाजार परिसरातील गावांनाच फायदा होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. उन्हाच्या तीव्रतेने खरीप पिके पूर्णत: करपली आहेत. रबीची आशाही धूसर झाली. जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

धरण जवळ असूनही सिंचनासाठी काहीच फायदा येथील शेतकऱ्यांना होत नाही. धरणाचा फायदा नांदेड, वसमत, जवळा बाजार, हट्टा परिसरातील शेतकऱ्यांनाच होत आहे. पाण्यावाचून खरीप हंगामातील पिकांची स्थिती डोळ्यांनी आता बघावली जात नाही. असे पुसेगाव येथील शेतकरी बळीराम धाबे यांनी सांगीतले. तर शेतकरी सुभाष मुंदडा म्हणाले, सिद्धेश्वर धरण जवळ असूनही परिसरातील शेतकरी नापिकीमुळे हतबल झाले आहेत. परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करुन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंदडा यांनी केली.
 

Web Title: 'There is no use of dam,to nearer land'; The villages near the dam in Sengawa are in drought-prone areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.