वस्तीत पाणी सोडल्याचा वाद गेला ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:39 PM2018-07-12T23:39:41+5:302018-07-12T23:39:55+5:30
कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील मागास वस्तीत रस्ता फोडून शेतातले पाणी सोडण्यात आले. या प्रकरणी बौद्ध समाजातील नागरिकांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. तर बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूच्या व्यक्तींची सभा भरली आणि दोन्हीकडील समाजबांधवांना वाद वाढवू नये, अशा सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील मागास वस्तीत रस्ता फोडून शेतातले पाणी सोडण्यात आले. या प्रकरणी बौद्ध समाजातील नागरिकांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. तर बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूच्या व्यक्तींची सभा भरली आणि दोन्हीकडील समाजबांधवांना वाद वाढवू नये, अशा सूचना दिल्या.
कळमनुरी तालुक्यातील मौजे वडगाव येथील नानाराव बळवंतराव देशमुख, बाजीराव मुकिंदराव देशमुख, मुंजाजी बाबूराव देशमुख, संतोष मधुकर देशमुख यांनी त्यांच्या शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी रस्ता फोडून ते पाणी बौद्ध वस्तीत सोडले, असा आरोप बौद्ध समाजातील नागरिकांनी केला. याप्रकरणी कळमनुरीच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांना दिनांक ९ जुलै रोजी अर्ज देऊन बौद्ध वस्तीत सोडलेले पाणी अडविण्याची विनंती केली होती. परंतु त्यानंतरही हे पाणी सुरू असल्याने येथील बौद्ध वस्तीतील नागरिकांना याचा त्रास होत होता. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व पुतळा परिसरातही पाणी साचत आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भावही होत आहे. त्यामुळे याप्रकरणी न्याय द्यावा, अशी विनंती तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला. त्यानंतरही संबंधित लोक ऐकत नसल्यामुळे बाळापूर पोलिस ठाण्यांमध्ये यासंबंधाने अर्ज दिला होता.
बाळापूर पोलीस ठाण्यातील या भागाचे बीट जमादार वडकिले, शेख बाबर यांनी दोन्ही बाजूंच्या मंडळींना पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दोन्ही बाजूच्या मंडळीची मत-मतांतरे ऐकून घेतली. या कारणामुळे कोणताही वाद उद्भवू नये, अशी सूचना पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
पोलिसांना दिलेल्या निवेदनावर वडगाव येथील माणिक लोकडे, विजय महादेव लोकडे, भीमराव लोकडे, मधुकर संभाजी लोकडे, तुकाराम लोकडे, नामदेव लोकडे, श्यामराव लोकडे, रुस्तुम लोकडे, भीमराव लोकडे, रवींद्र लोकडे, भगवान लोकडे, दत्ता लोकडे, तुकाराम लोकडे यांच्यासह समाजबांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत.