या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:41+5:302021-08-22T04:32:41+5:30
हिंगोली : कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाने आता कुठे कात टाकली होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असताना ...
हिंगोली : कोरोनामुळे तब्बल दीड वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाने आता कुठे कात टाकली होती. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असताना आता गळक्या बसेसची चिंता आगार प्रशासनाला भेडसावत आहे. गळक्या बसेसला वेदर स्ट्रीप लावून पावसाचे पाणी थोपविण्याचा प्रयत्न आगार प्रशासन करीत आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या काळात एसटी बसेस सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावेत, याची चिंता एसटी प्रशासनाला लागली होती. जिल्ह्यासह राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुन्हा एसटी बसेस सुरू करण्यात आल्या. प्रमुख मार्गावर बसेस धावत असल्याने प्रवासी भाड्यातून उत्पन्न हाती येत आहे. एसटीचा कारभार पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच हिंगोली आगार प्रशासनाला डिझेल टंचाईसारख्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. त्यात गळक्या एसटी बसेस डोकेदुखी ठरत आहेत. आगाराकडे ५८ बसेस असल्या तरी यातील बहुतांश बसेस पावसात गळत आहेत. टपावरून पाणी थेट आतमध्ये येत असल्याने प्रवासी चिंब होत आहेत. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच व चांगली बस बघूनच प्रवासी बसमध्ये चढत आहेत. प्रवाशांची नाराजी लक्षात घेता गळक्या बसेसला वेदर स्ट्रीप लावण्याचे काम हाती घेतले आहे. बहुतांश बसेसला वेदर स्ट्रीप बसविण्यात आल्या आहेत. बस गळत असल्याचे दिसताच दुरुस्ती केली जात आहे.
- पी.बी. चौथमल, आगार व्यवस्थापक, हिंगोली
एसटीचा कसरतीचा प्रवास
ग्रामीण भागात काही मार्गावर बसेस सोडण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र खिळखिळ्या बसेस सोडल्या जात असल्याने पावसाच्या पाण्यात गळत आहेत. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.- दीपक मगर, पळसोना
हिंगोली आगारातील काही बसेसला टपावर ठिगळ लावले आहे. यामधून पावसाचे पाणी बसमध्ये शिरत असल्याने अंगावरील कपडे भिजत आहेत.
- यादव जारे, केंद्रा बु.
गाड्यांचा मेंटेनन्स वाढला
कोरोना काळात बहुतांश बसेस एकाच जागेवर उभ्या होत्या. बसेस चांगल्या स्थितीत रहाव्यात, यासाठी आगार प्रशासनाने काळजी घेतली. तरीही हिंगोली आगारातील काही बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे मेंटेनन्स वाढला. बस दुरुस्तीसाठी आगाराला आर्थिक ओढाताण सहन करावी लागत आहे.