हिंगोलीतील भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी चोरट्यांचा डल्ला
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: December 19, 2022 08:28 PM2022-12-19T20:28:31+5:302022-12-19T20:29:03+5:30
आमदार मुटकुळे यांच्यासह चौघांचे घर फोडले,एकाच्या शेळ्या नेल्या चोरून
हिंगोली: भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आमदार मुटकुळे यांच्या तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कागदपत्रे व इतर सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. चोरट्यांनी इतर चार ठिकाणीही चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती आखाड्यावरील शेळीचे दोन पिल्ले लागले. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
हिंगोली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे आडगाव मुटकूळे हे गाव आहे. गावात त्यांनी नवीन घराचे बांधकाम केले. मात्र त्यांचे कुटूंबिय जुन्या घरीच राहतात. १८ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी गावात प्रवेश केला आणि मुटकुळे यांच्या नवीन घराचा दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील लाकडी प्लायवूडचे कपाट उघडून कागदपत्रे व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी गावातील ज्ञानबा नवसाजी मुटकुळे, भाऊराव किसनराव मुटकुळे, नारायण सखाराम मुटकुळे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
त्यामुळे चोरट्यांनी आडगाव शिवारातील भागवत पुंजाजी खोरणे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेले शेळीचे दोन पिल्ले लंपास केले. एकाच रात्री चोरट्यांनी चार घरांचे कुलूप तोडून हैदोस घातला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण मळघणे, उपनिरीक्षक म.ए. मुपडे, हवालदार अशिष उंबरकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी रविवारी गावात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाले. मात्र आज चोरीची घटना घडल्याची माहिती त्यांना समजली. याप्रकरणी त्यांचा मुलगा शिवाजी तान्हाजी मुटकूळे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक एम.एम. मुपडे तपास करीत आहेत.