रेकी करून म्हशी लांबविल्या! ४० ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांना पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:35 PM2024-01-21T19:35:14+5:302024-01-21T19:35:38+5:30
दिवसा दुचाकीवरून जनावरांची रेकी करून रात्रीला वाहनात टाकून लंपास करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
हिंगोली: दिवसा दुचाकीवरून जनावरांची रेकी करून रात्रीला वाहनात टाकून लंपास करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यासाठी पथकाने १०० किलोमीटरपर्यंत ४० ते ५० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरटे निष्पन्न केले. यातील फरार तीन चोरट्यांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात पशुधनाची चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. शेतात, आखाड्यावर बांधलेली जनावरे टार्गेट करून वाहनातून रात्रीतून विल्हेवाट लावली जात होती. त्यामुळे पशुपालकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
दरम्यान, कळमनुरी शिवारातील नंदकुमार सोनटक्के यांच्या शेतातून दोन म्हशी चोरीला गेल्या होत्या. यातील चोरट्यांचा सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने शोध घेण्यास सुरूवात केली. यातील चोरटे कळमनुरी येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने अल्ताफ खान गफार खान पठाण, वसीम अक्रम शेख हबीब (दोघे रा. इंदिरानगर कळमनुरी), अजीम खान जरीब खान पठाण (रा. खाजा कॉलनी कळमनुरी) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी म्हशीची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच उरूज खान युसूफ खान (रा. खाजा कॉलनी कळमनुरी) याचेसोबत त्याचे दुचाकीवर रेकी केली. तसेच एका वाहनातून म्हशींची चोरी करून इमरान कुरेशी मकदूम कुरेशी व मकदूम कुरेशी मो. इस्माईल कुरेशी (दोघे रा. पूर्णा जि. परभणी) यांना विकल्याचे त्यांनी सांगितले.
म्हशी विकून आलेले पैसे व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यातील रेकी करणारा व पूर्णा येथील म्हशी घेणारे असे एकूण तिघेजण फरार आहेत. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.
सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरटे केले निष्पन्न
दरम्यान, म्हशी चोरटे निष्पन्न करण्यापूर्वी पोलिसांनी १०० किलोमीटर अंतरावरील जवळपास ४० ते ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात म्हशी चोरटे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही उचलले.
रॅकेटमध्ये प्रतिष्ठितांचा सहभाग
म्हशींची चोरी करून पूर्णा येथील दोघांना विक्री केल्या. पूर्णा येथील म्हशी घेणारे पितापुत्र असून एकजण एका पक्षाचा माजी नगरसेवक आहे. दोघे जण म्हशी चोरीचे रॅकेट चालवित असल्याचेही निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात आणखी काही चोऱ्या उघडकीस येऊ शकतात, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.
दुचाकीवरून केली रेकी
म्हशी चोरट्यासाठी चोरट्यांनी कोणाला संशय येऊ नये यासाठी दुचाकीवरून रेकी केली. त्यानंतर एका वाहनातून म्हशी टाकून विक्री केली.