हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुडगूस; पोलिसांनी दोन पथक नेमले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 08:05 PM2017-12-16T20:05:10+5:302017-12-16T20:05:31+5:30
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडघूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दागिणे, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसां समोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
हिंगोली : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडघूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दागिणे, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसां समोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मागील पंधरा दिवसांत १२ चोरींच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली.
जिल्ह्यात घराफोडींचे प्रमाण वाढल्याने पोलिसांसमोर जणू चोरट्यांनी त्यांना पकडण्याचे आव्हानच केले आहे. विशेष म्हणजे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलुप तोडून चो-यांचे प्रमाण जास्त आहे. डिसेंबर महिन्यात जास्तीत-जास्त चोरींच्या घटना घडल्या आहेत. मागील पंधरा दिवसांत तब्बत १२ चोरी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची नोंद पोलीस दरबारी आहे. घटनांची संख्या लक्षात घेता पोलिसांना जणू चोरट्यांनी एका प्रकारे आव्हानच केले आहे. विशेष म्हजणे तपासिक अंमलदाराकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात असला तरी, अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. चो-यांच्या घटनांमुळे एखादी परराज्यातील टोळी हिंगोली जिल्ह्यात दाखल तर झाली नाही, असा अंदाज नागरिक काढत आहेत.
असे दाखल आहेत चोरींचे गुन्हे
कळमनुरी तालुक्यातील बाळापुरातही चोरींचे प्रमाण जास्त आहे. १५ डिसेंबर रोजी भरदिवसा शिक्षक कॉलनीतील एका घराचे कुलूप तोडून दीड लाख रुपये नगदी व सोन्याचे दागिने असा २ लाख २७ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. वसमत तालुक्यातील वर्ताळा येथील शेतातून चोरट्यांनी विहिरीतील विद्युत मोटार व इतर साहित्य एकूण २३ हजार ५२० रूपयांची चोरी केली. याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी कुरूंदा ठाण्यात चोरीची नोंद केली. ७ डिसेंबर रोजी वसमत तालुक्यातील हट्टा ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. वसमत येथील रेल्वेस्थानकावर एकास तलवारीच्या धाकावर लुटले, असून याप्रकरणी १ डिसेंबरला जबरी चोरीचा गुन्हा वसमत शहर ठाण्यात दाखल आहे. हिंगोली शहरातील महसूल कॉलनी येथे घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दािगणे लंपास केल्याची घटना घडली होती याप्रकरणी १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल आहे. तर १४ डिसेंबर रोजी वसमत येथील मोंढ्यातून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. यासह विविध घटनांच्या नोंदी पोलीस दरबादी दाखल असून तपास सुरू आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कि, कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापुर परिसरात चोरींचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे नांदेड येथील चोरट्यांचा या घटनांशी जास्त संबध असू शकतो. पोलीस प्रशासनाकडून चो-यांच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत कसून तपासणी सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी सांगितले. तपास मोहीमेसाठी दोन पथकेही तैनात असल्याची माहिती गुंजाळ यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.