सराफा दुकान फोडणाऱ्या चोरट्यांचे पोलिसांवर दगडफेक करत पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:17 PM2019-08-03T15:17:27+5:302019-08-03T15:19:04+5:30
या थरारक घटनेत चोरट्यांनी एका सुरक्षारक्षकास सुद्धा मारहाण केली.
आखाडा बाळापूर (हिंगोली ) : मराठवाडा चौकातील सराफा बाजारातील एक दुकान चोरट्यांनी फोडून २ लाखाची दागिने लंपास केली. दरम्यान, गस्तीवरील पोलिस घटनास्थळी पोहताच चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक करत पलायन केले. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या थरारक घटनेत चोरट्यांनी एका सुरक्षारक्षकास सुद्धा मारहाण केली.
शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मराठवाडा चौकातील बोंढारे ज्वेलर्स या दुकानाचे लोखंडी शटर उघडून आत प्रवेश केला. दुकानातील दागिन्यांवर त्यांनी डल्ला मारला. याच दरम्यान तिथे गस्तीवरील पो.नि.गणेश राहिरे , जमादार अंकुश शेळके आदी पोलिस कर्मचाऱ्यांची जीप आली. चोरट्यांनी तेथील एका सुरक्षारक्षकास मारहाण करताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. पोलिसांना पाहताच चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली व तेथून पलायन केले.
ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यासोबतच चोरट्यांनी सराफा दुकानाच्या बाजूस असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये चोरी करत रोख १२ हजार रुपये, एक हार्डडिक्स व कॅमेरा लंपास केला. सराफा दुकानदार संदीप बोंढारे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.