दुकाने फोडणारे चोरटे लवकरच गजाआड असतील - राकेश कलासागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:17+5:302021-01-03T04:30:17+5:30
आखाडा बाळापूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापूर व वारंगा फाटा येथे चोरट्यांनी दुकाने फोडून दहशत निर्माण केली असली तरी ...
आखाडा बाळापूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापूर व वारंगा फाटा येथे चोरट्यांनी दुकाने फोडून दहशत निर्माण केली असली तरी लवकरच हे सर्व चोरटे गजाआड असतील असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी व्यक्त केला.
आखाडा बाळापूर येथे एकाच दिवशी दहा दुकाने फोडली होती तर वारंगा फाटा येथे सहा दुकाने फोडून काही दुकानांमधून चोरी केली होती. चोरांच्या या कृतीमुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. याप्रकरणी चोरट्यांचा माग लागला असून लवकरच हे चोरटे गजाआड असतील. चोरीची प्रकरणे जवळपास उघडकीस आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले आहे. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. त्यांच्याशी कठोर वर्तन करूनच समाजात शांतता व सुव्यवस्था राखली जाईल असेही सांगितले.
आखाडा बाळापूर येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बाळापूर येथील अनेक पोलीस कर्मचारी हिंगोली, नांदेड अशा ठिकाणाहून ये-जा करतात. त्यांच्या निवासस्थानासाठी काही करता येईल का, याचाही मागोवा घेतला जात आहे. येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प वसाहतीतील काही गाळे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, ठाणेदार रवी हुंडेकर, पोउपनि अच्युत मुपडे यांनी वसाहतीत जाऊन काही गाळ्यांची पाहणी केली. एकंदरीत रिकामे गाळे पोलिसांच्या निवासस्थानासाठी वापरात आली तर अनेक गोष्टी सुरळीत होतील, असेही सांगण्यात आले.