‘त्या’ १२0 कलाकारांना अजून मानधन मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:29 AM2018-10-20T00:29:10+5:302018-10-20T00:29:30+5:30
वृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपैकी १२0 जणांची गतवर्षी मानधनासाठी निवड झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती छदामही पडला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपैकी १२0 जणांची गतवर्षी मानधनासाठी निवड झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती छदामही पडला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध साहित्यिक तथा कलाकारांना जीवन जगण्यासाठी मदत म्हणून त्या-त्या श्रेणीनुसार अनुदान दिले जाते. जि.प.कडून दरवर्षी ६0 कलाकारांची या योजनेत निवड केली जाती. मात्र २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षांसाठी एकत्रितच १२0 कलाकारांची निवड गतवर्षी करण्यात आली. समितीने या कलाकारांची निवड केली असली तरीही त्यांना मानधन मात्र सुरू झाले नाही. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे ही यादी वेळेत पोहोचल्याचेही सांगितले जाते. तरीही एकाही कलाकाराच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे ही कलाकार मंडळी समाजकल्याण विभागाचे खेटे घालत आहे. त्यांना मात्र मंत्रालय स्तरावरूनच मंजुरी मिळाली नसल्याचे ऐकायला मिळत आहे.
यंदासाठी प्रस्ताव मागविले
यावर्षी आता पुन्हा ६0 कलाकारांची निवड मानधनासाठी करावी लागणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव मागविले आहेत. संबंधित पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. ते जि.प.च्या समाजकल्याणकडे आल्यानंतर वृद्ध कलाकारांची निवड करण्यासाठी असलेल्या समितीसमोर सादर केले जाणार आहेत. आॅक्टोबरअखेरपर्यंत प्रस्ताव दाखल करता येतील,असे समाजकल्याणकडून सांगण्यात आले.