‘हर हर महादेव’ जयघोषात नागनाथाचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 04:47 PM2019-03-04T16:47:48+5:302019-03-04T16:50:43+5:30
औढानगरी महाशिवरात्रीनिमित्त भक्तीमय झाली होती.
- गजानन वाखरकर
औंढा नागनाथ (हिंगोली ) : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या ओैंढा नागनाथ येथील नागेश दारुकावने येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासून हर हर महादेवाच्या जयघोषात एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी दर्शन घेतल्याचे संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सांगितले.
महाशिवरात्री म्हणजे महादेव आणि पार्वती यांच्या विवाहाचा दिवस. ‘हर हर महादेव, ओम नम: शिवाय’ च्या गजरामध्ये लाखो भाविक महाशिवरात्रीच्या पर्वावर ज्योतिलिंर्गाचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून पुण्य संचित करत असतात. २२ वर्षानंतर सोमवारी सोमवती अमावस्येच्या पर्वावर हा योग आल्याने या दिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. महाशिवरात्रीच्या रात्री २ वाजता मंदिर सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्याअगोदर रात्री साडेबारा वाजता खा. राजीव सातव सपत्नीक, तहसीलदार पांडुरंग माचेवाड सपत्नीक, विद्या पवार, सल्लागार शिवाजी देशपांडे यांनी सपत्नीक महापूजा केली. तसेच स्थानिक ब्रह्मवृंद तुळजादास शास्त्री, उमेश भोपी, श्रीपाद दीक्षित, कृष्णा ऋषी, राजू देव, दिना पाठक, पद्माक्ष पाठक, बंडू पंडित, संजय पाठक, कांतागुरू बल्लाळ यांनी श्री महापूजा समर्पित केली.
प्रथम पूजेचा मान भाविक अविनाश अकमार रा. पणकनेरगाव यांना मिळाला. हा मान घेण्याचे त्यांचे सलग सहावे वर्ष आहे. मंदिर संस्थनातर्फे त्यांचा मंदीराचा फोटो, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी एक लाख भाविकांनी श्रींचे दिवसभर दर्शन घेतले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी ए.जे. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी कडक बदोबस्त ठेवला. औढानगरी महाशिवरात्रीनिमित्त भक्तीमय झाली होती. पालखी व दिंड्या आज दर्शनासाठी आल्या. यावेळी विश्वस्त डॉ. पुरुषोत्तम देव, गणेश देशमुख, गजानन वाखरकर, शिवाजी देशपाडे, डॉ. विलास खरात, आनंद निलावार, मुंजाभाऊ मगर सह विश्वस्त अधीक्षक वैजेनाथ पवार, शंकर काळे आदी उपस्थित होते.