दुचाकीच्या लिलावासाठी हजारोंच्या गर्दीचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:09+5:302021-07-27T04:31:09+5:30
हिंगोली : येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात बेवारस १९७ दुचाकी वाहनांचा लिलाव २६ जुलैरोजी ठेवला होता. लिलावात सहभागी होण्यासाठी ...
हिंगोली : येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात बेवारस १९७ दुचाकी वाहनांचा लिलाव २६ जुलैरोजी ठेवला होता. लिलावात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक दाखल झाली. मात्र सर्व वाहने खरेदी करणाऱ्यालाच लिलावात सहभागी होता येणार असल्याचे जाहीर केल्याने खरेदीसाठी आलेल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दरम्यान, या गर्दीमुळे पोलीस अधीक्षक कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. त्यामुळे गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत १९८ दुचाकी वाहने बेवारस आढळली होती. ही वाहने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ठेवण्यात आली होती. वाहनांचे आरटीओ नंबर, चेचीस नंबर, इंजिन नंबरवरून मूळ मालक, वारसदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र मूळ मालकांची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतला. यासाठी आरटीओ यांच्या नियमाप्रमाणे वाहने स्क्रॅप करून त्यांची किंमत आकारण्यात आली. तसेच तहसील प्रशासनाचीही परवानगी घेऊन २६ जुलैरोजी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात सकाळी ११ वाजता १९८ वाहनांचा एकत्रित जाहीर लिलाव आयोजित केला होता. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतात. तसेच दुचाकींचा लगेच ताबा देण्यात येईल, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले होते. लिलावात प्रत्येक दुचाकीचाही वेगवेगळा लिलाव होणार असल्याचे समजून जिल्हाभरातून हजारो नागरिक दाखल झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. लिलाव प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर लिलावात सहभागी होण्यासाठी २ लाख रुपयांची अनामत रक्कम ठेवण्याचे सांगण्यात आले. तसेच सर्व दुचाकी खरेदी करणाऱ्यालाच यात सहभागी होता येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एक-एक दुचाकी खरेदीसाठी आलेल्या् नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला. तरीही गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती.
कोरोना नियमांचा फज्जा
दुचाकीच्या जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक दाखल झाले होते. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात जेवढी गर्दी तेवढीच नांदेड रोडवर होती.
८ लाखांच्या पुढे बोली...
लिलाव १९८ दुचाकींचा होणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र लिलावाच्यावेळी एकाने दुचाकीचे कागदपत्रे दाखविल्याने १९७ दुचाकींचा लिलाव घेण्यात आला. यावेळी लिलावात ३७ जणांनी सहभाग नोंदविला. ८ लाख रुपयांपासून बोलीस सुरुवात झाली. अखेर ....लिलाव सोडण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपाधीक्षक सरदारसिंग ठाकूर, सुरेश कंदकुर्तेकर, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, महसूलचे मंडळल अधिकारी दराडे आदींची उपस्थिती होती.
फोटो :