श्रावण सोमवारी औंढा फुलले, बम बम भोलेच्या गजरात हजारो भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 06:51 PM2022-08-01T18:51:30+5:302022-08-01T18:54:06+5:30
दर्शनास जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी एकच मार्ग असल्याने एका भाविकाला किमान पाच ते सहा तासाचा वेळ लागत आहे.
औंढा नागनाथ (हिंगोली) : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात श्रावणाच्या पहिल्या श्रावण सोमवारी पहाटे दोन वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांनी मोठ्या मनोभावे हर हर महादेवाच्या गजरात प्रभू नागनाथाचे दर्शन घेतले. श्रावणी सोमवार व नागपंचमी सलग दोन दिवस लागोपाठ आल्याने भाविकांचा ओढा कायम राहील अशी शक्यता आहे.
संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते प्रभू नागनाथाची शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर पहाटे दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. गत दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद होते. यावर्षी कोरोना लाट ओसरल्याने नियम आणि अटीविना दर्शनाची मुभा आहे. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, मुंबई येथून भाविकांनी हर हर महादेवाच्या गजरात दर्शन घेतले. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दरम्यान, संस्थानकडून गर्भ घरातील अभिषेक बंद करण्यात आले आहेत. रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, भाविकांना दर्शनास जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी एकच मार्ग असल्याने एका भाविकाला किमान पाच ते सहा तासाचा वेळ लागत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, कांबळे,पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,एपीआय अनिल लांडगे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील आणि कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत गर्दीचे नियंत्रण केले.
सुलभ दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करावी
सकाळी नऊ वाजल्यापासून दर्शन रांगेत लागले पाच घंटे झाले अद्यापही दर्शनाची प्रतीक्षा आहे - द्वारकाबाई नागरे, कौडगाव
दर्शनाची रांग हळूहळू पुढे सरकत असल्याने सहा घंटे झाले अद्यापही दर्शन झाले नाही. आता पाय गळून आले आहेत. परंतु लवकरच दर्शन होईल अशी आशा आहे. सुलभ दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करावी
- जगन्नाथ हेबाडे, वलाना, परभणी