लुटमारीतील तीन आरोपींना यवतमाळ जिल्ह्यातून केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:52 PM2018-10-03T16:52:32+5:302018-10-03T16:53:10+5:30
सोने देण्याची लालूच दाखवून एकास तलवारीच्या धाकावर लुटल्याची घटना हिंगोली- रिसोड रोडवरील उमरा पाटीजवळ २५ सप्टेंबर रोजी घडली होती.
हिंगोली : सोने देण्याची लालूच दाखवून एकास तलवारीच्या धाकावर लुटल्याची घटना हिंगोली- रिसोड रोडवरील उमरा पाटीजवळ २५ सप्टेंबर रोजी घडली होती. यातील तिन आरोपींना यवतमाळ जिल्ह्यातून रविवारी अटक करण्यात आली आहे.
हिंगोली-रिसोड रस्त्यावरील उमरा पाटीजवळ जीप थांबवून नितीन तुकाराम राठोड (रा. रोहडा जि. यवतमाळ) वनरक्षकास लुटल्याची घटना घडली होती. राठोड यांच्याकडील तीन लाखांची रोकड व पॉकेटमधील दोन हजार, मोबाईल असा एकूण ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल आरोपींनी २५ सप्टेंबर रोजी लंपास केला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. लुटमार प्रकरणातील आरोपींचा पोलीस कसून शोध घेत होते. आरोपींची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाल्याने सापळा रचून आरोपींना जेरबंद करण्यात आले.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा व हिंगोली ग्रामीण पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. सायबरसेलची मदत घेत तपासाची चक्रे पोलिसांनी फिरविली. आरोपींचे वर्णन, त्यांचे राहणीमान व बोलण्याची भाषा आदी माहिती खबऱ्यांना दिली. शिताफीने पथकाने कारवाई करून यवतमाळ जिल्ह्यातून तिघांना अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली.
या आरोपींची अधिक चौकशी करण्यात येणार आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे संतोष शंकर चव्हाण (रा. वडद ता. महागाव जि. यवतमाळ), माऊली उर्फ मिथून मधूकर चव्हाण (रा. पांगरखेडा ता. शिरपूर जि. वाशिम), सुरेश पुंडलिक पवार (रा. वडद ता. महागाव जि. यवतमाळ) अशी आहेत. स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार, पोनि मारोती थोरात, पोउपनि लंबे, केंद्रे, किशोर पोटे, पाहेकॉ बालाजी बोके, पोहेकॉ नानाराव पोले, विलास सोनवणे, राठोड, शंकर जाधव, संभाजी लेकुळे, चौधरी, उंबरकर, सावळे, अशोक धामणे, सायबरसेलचे सपोउपनि अयुब पठाण आदींनी कामगिरी केली.