साडेतीन लाख लुटले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:11 AM2018-09-26T01:11:57+5:302018-09-26T01:12:15+5:30
तालुक्यात जवळा-पळशी रस्त्यावर तलवारीचा धाक दाखवून गाडीतील साडेतीन लाखांची रोकड लंपास केल्याच्या चर्चेने मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या हिंगोली ग्रामीण पोलिसांची चांगलीच गाळण उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यात जवळा-पळशी रस्त्यावर तलवारीचा धाक दाखवून गाडीतील साडेतीन लाखांची रोकड लंपास केल्याच्या चर्चेने मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या हिंगोली ग्रामीण पोलिसांची चांगलीच गाळण उडाली.
जीप क्रमांक एमएच- २२ एएम-०९४६ मधून प्रताप नंदकुमार शिंदे, किशोर गणेश मस्के, नितीन राठोड हे तिघे जात असताना एकाने हात दाखविला. तेव्हा त्यांनी त्याला आत घेतले. काही अंतरावर जीप गेल्यावर त्याने पोटदुखीचा बहाणा करत जीप थांबवायला सांगितली. परंतु यापूर्वीच पूर्वनियोजित शेतात दबा धरून बसलेल्या तिघांनी हातात वाहनाच्या दिशेने धाव घेत तलवारीचा धाक दाखवून गाडीतील साडेतीन लाख लंपास केल्याचे संदेश व्हॉटस्अॅपवर फिरत होते. यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नेमका प्रकार काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच हाती न लागल्याने ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. याबाबत पोनि मारोती थोरात म्हणाले, शस्त्राच्या धाकावर वाहन लुटल्याचे हे प्रकरण नाही. संबंधितांची चौकशी केली तर ते वेगवेगळी माहिती देत आहेत. नेमका प्रकार कळाल्यास गुन्हा दाखल करणार आहोत.