जिल्ह्यात वीज पडून महिलेसह तीन जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:21+5:302021-06-09T04:37:21+5:30
कळमनुरी तालुक्यातील जरोडा शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. ७ जून रोजी सकाळी शेतकरी देवराव भिसे पाटील यांच्या शेतात ...
कळमनुरी तालुक्यातील जरोडा शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. ७ जून रोजी सकाळी शेतकरी देवराव भिसे पाटील यांच्या शेतात गावातील काही महिला कामासाठी गेल्या होत्या. त्यानंतर दुपारच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या महिला जवळच असलेल्या झाडाखाली थांबल्या. यावेळी झाडावर वीज कोसळली. यामध्ये इंदिराबाई कोंडबाराव भिसे (वय ६९) यांचा मृत्यू झाला. तर रेणुका प्रकाश भिसे (वय ३८), सुरेखा प्रभाकर भिसे (वय ३५), जिजाबाई काशीराम गायकवाड (वय ६३), वनिता डिगांबर सूर्यवंशी (वय ३१, सर्व रा. जराेडा), शाेभाबाई सखाराम राठाेड (रा. चुंचा तांडा) या महिला जखमी झाल्या.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जराेडा येथील तंटामुक्ती अध्यक्ष देवराव पाटील, राजेश पाटील, गणेश गायकवाड, विजय भिसे यांच्यासह सपाेनि रवी हुंडेकर, जमादार मधुकर नागरे, पंढरीनाथ चव्हाण, गजानन मुटकुळे, मंडळाधिकारी नाईक, तलाठी माेरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी महिलांना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मयत इंदिराबाई यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी बबन हरिलाल चव्हाण यांची एक शेळी दगावली आहे.
पिंपळदरी येथे दोन जनावरे दगावली
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे दुपारी २ वाजेच्या सुमारास वीज कोसळून दोन जनावरे दगावली. केशव रिठ्ठे यांनी त्यांच्या मालकीचा बैल व गाय घरासमोरील झाडाखाली बांधली होती. यावेळी अचानक वीज कोसळून बैल व गायीचा मृत्यू झाला. यामुळे रिठ्ठे यांचे मोठे नुकसान झाले आहे.