तीन दिवसानंतर ‘लालपरी’ रस्त्यावर; एसटी महामंडळाचे ५५ लाखांचे उत्पन्न बुडाले
By रमेश वाबळे | Published: September 5, 2023 03:49 PM2023-09-05T15:49:57+5:302023-09-05T15:51:06+5:30
हिंगोली, वसमत, कळमनुरी आगाराच्या २ हजार ४५१ बसफेऱ्या झाल्या रद्द...
हिंगोली : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांवर झालेल्या लाठीमारच्या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत असून, यादरम्यान काही जिल्ह्यात एसटी बससह इतर वाहनांची जाळपोळ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही आगारांच्या वतीने २ ते ४ सप्टेंबरदरम्यान बससेवा बंद ठेवण्यात आली होती. तर ५ सप्टेंबरच्या सकाळपासून बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. बंद काळात तिन्ही आगारांचे जवळपास ५५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद २ सप्टेंबरपासून जिल्ह्यात उमटले. घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलनादरम्यान वाहनांची जाळपोळ झाली. त्यामुळे २ ते ४ सप्टेंबरदरम्यान एसटी बसची वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली. या दरम्यान हिंगोली आगाराच्या जवळपास १ हजार ११० बसफेऱ्या रद्द झाल्या असून, जवळपास २४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. तर वसमत आगाराच्या सुमारे ८०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने २० लाख रुपयांचा फटका बसला. तर कळमनुरी आगाराच्या जवळपास ५०० फेऱ्या रद्द झाल्या असून, या आगाराचे १२ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. ४ सप्टेंबरच्या जिल्हा बंदनंतर ५ सप्टेंबरपासून परिस्थिती पूर्वपदावर आली. त्यामुळे पहाटेपासूनच जिल्ह्यातील तिन्ही आगारांच्या वतीने बससेवा सुरू करण्यात आली. बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बससेवा पूर्ववत...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील चार दिवसांपासून आंदोलने सुरू होती. यादरम्यान एसटीबसचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मंगळवारपासून सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
- एफ. एम. शेख, वाहतूक निरीक्षक, हिंगोली