कळमनुरीतील इसापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिन मित्रांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:48 PM2020-06-07T16:48:49+5:302020-06-07T17:39:59+5:30
पाच मित्र पोहण्यासाठी धरणावर गेली होती,त्यातील तिघे बुडाली
कळमनुरी (जि. हिंगोली) : पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचा कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण जवळील इसापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना ७ जून रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या तिघांचेही मृतदेह सापडले असून मयत तरूण हे हिंगोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मयतांची नावे शिवम सुधीर चौंढेकर (२१), रोहित अनिल चित्तेवार (२२), योगेश बालाजी गडप्पा (२१) अशी आहेत.
सविस्तर माहिती अशी की शिवम सुधीर चौंढेकर (२१) रा. भट कॉलनी हिंगोली, रोहित अनिल चित्तेवार (२२) रा. पोस्ट आॅफिस रोड हिंगोली, योगेश बालाजी गडप्पा (२१) रा. बियाणीनगर तसेच श्रीकांत संजीव चौंढेकर व निखिल नागोराव बोलेके हे पाचजण मित्र हिंगोली येथून कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण जवळील इसापूर धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहल्यानंतर श्रीकांत व निखिल हे दोघेजण धरणाबाहेर आले. परंतु शिवम, रोहित आणि योगेश हे पाण्याबाहेर आलेच नाहीत. त्यामुळे श्रीकांत व निखिलने याबाबत जवळील ग्रामस्थांना माहिती दिली.
काही वेळातच घटनास्थळी पोलीस अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. यावेळी गावातील ग्रामस्थही मदतीला धावून आले आणि शोधकार्य सुरू झाले. गोताखोर समशेर खाँ पठाण, कांता पाटील व ग्रामस्थांनी तब्बल एका तासानंतर वरील तिघांचेही मृतदेह धरणातील पाण्याबाहेर काढले. घटनास्थळी पोनि रंजित भोईटे, फौजदार ज्ञानोबा मुलगीर, ना. तहसिलदार श्रीराम पाचपुते, मंडळाधिकारी यु. आर. डाखोरे पोलीस कर्मचारी शामराव गुहाडे, गणेश सुर्यवंशी, नलावार तात्काळ पोहचले होते.