कलगाव येथे तीन घरांना आग; चार शेळ्यांसह संसारोपयोगी साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:10+5:302021-04-23T04:32:10+5:30
हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथे बुधवारी रात्री तीन घरांना अचानक आग लागली. या आगीत चार शेळ्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून ...
हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथे बुधवारी रात्री तीन घरांना अचानक आग लागली. या आगीत चार शेळ्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे तीन कुटुंबे उघड्यावर आली आहेत. तीन कुटुंबांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. कलगाव येथे २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तीन घरांना अचानक आग लागली. आगीत चार शेळ्यांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सदरील घरे विलास सखाराम वाघमारे, देवीदास नारायण कर्डिले व अन्य एक असे तिघांचे होते. घरांना आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी आग शमविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ज्यामध्ये देवीदास नारायण कर्डिले यांच्या चार शेळ्या आगीमध्ये होरपळल्या गेल्या. यानंतर रात्री एक वाजेच्या सुमारास अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. सदरील आग अग्निशामक दलाच्या पथकाने आटोक्यात आणली.
घटनेची माहिती कळताच गुरुवारी तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी पोहरे, विस्तार अधिकारी भोजे, कारेगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली.