हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर भीषण अपघात, ट्रॅक व आयशरच्या धडकेत तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:53 PM2022-02-01T12:53:15+5:302022-02-01T12:53:27+5:30

अपघातातील जखमींना नांदेडला हलविण्यात आले आहे.

Three killed in accident on Hingoli to Kanergaon road | हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर भीषण अपघात, ट्रॅक व आयशरच्या धडकेत तीन ठार

हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर भीषण अपघात, ट्रॅक व आयशरच्या धडकेत तीन ठार

Next

हिंगोली: हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावरील कलगाव पाटीजवळ भरधाव ट्रक व आयशर टेम्पोची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ३१ जानेवारी रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. पवन शंकर गायकवाड (रा. नांदेड), मेहमुदखान (रा. सीपाहियोंका मोहल्ला, नागौर, राजस्थान) अशी दोन मयतांची नांव असून एकाचे नाव समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम येथून एक आयशर टेम्पो मोसंबी घेऊन नांदेडकडे निघाला होता. हा टेम्पो हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावरील कलगाव पाटी जवळ आला असताना समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकची टेम्पोला जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रकमधील दोघेही ठार झाले. त्यापैकी चालकाचे नांव महेमुदखान असून अन्य एकाचे नाव समजू शकले नाही. तर टेम्पोमधील पवन गायकवाड याचा मृत्यू झाला. तसेच टेम्पोमधील करण अशोक कदम हा गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,  सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, हिंगोली ग्रामीणचे निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मुपडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल भडंगे, नागूलकर, रवीकांत हरकाळ, आकाश पंडीतकर, अशोक धामणे, गजानन पोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी किरण यास उपचारासाठी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. या अपघातामुळे हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी रात्रीच क्रेन बोलावून अपघात ग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ट्रकमधील एका मयताची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Three killed in accident on Hingoli to Kanergaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.