हिंगोली जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:23 PM2019-07-03T15:23:01+5:302019-07-03T15:27:48+5:30
ट्रकने धडकेत काका-पुतण्याचा जागीच मृत्यू
कळमनुरी (जि. हिंगोलीे) : हिंगोली- नांदेड मुख्य रस्त्यावर मसोड फाट्याजवळ ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील काका व पुतण्या जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. दुसऱ्या अपघातात येडसी तांडा येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाला आहे.
कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथील संजय मारोती काजळे (२२), सोहम नागेश काजळे (७) हे दोघे कपडे आणण्यासाठी दुचाकीने (एमएच २०-८४२०) हिंगोलीकडे जात होते. ओव्हरटेक करीत असताना हिंगोलीहून येणाऱ्या ट्रकने (एपी ०७- टीएच-७४२९) दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. दोघांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. माहिती मिळाल्यानंतर एस.टी.गायकवाडी, विकी उरेवार, संदीप पवार या पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन ट्रकचालकास ताब्यात घेतले. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संजय काजळे हा त्याचा पुतण्या सोहम नागेश काजळे याला घेऊन हिंगोली येथे कपडे खरेदी करण्यासाठी जात होता. संजय अविवाहित होता. तर सोहम काजळे हा सालेगाव येथील जि.प. शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
बसच्या धडकेत तरुण ठार
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील येडसी तांडा परिसरात बस व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. बसच्या अपघातात दुचाकीस्वार आकाश शिवाजी खांडेकर (२७) हा जागीच ठार झाला आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठण्याचे एन. आर. राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली.