चोरट्यांकडून तीन लाख ८९ हजारांचे मोबाइल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:22+5:302021-04-28T04:32:22+5:30
हिंगोली : ढाब्यावर मुक्कामी थांबलेल्या ट्रकचालक, क्लिनरचे मोबाइलसह इतर किमती साहित्य लांबविणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या ...
हिंगोली : ढाब्यावर मुक्कामी थांबलेल्या ट्रकचालक, क्लिनरचे मोबाइलसह इतर किमती साहित्य लांबविणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तीन लाख ८९ हजार रुपयांचे ३३ मोबाइल जप्त केले. वसमत शहर पोलीस ठाण्यात मोबाइल चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. यावेळी या घटनेतील मोबाइल कैलास रमेश शिंदे (रा. वसमत) व सुनील संजय खिल्लारे (रा. म्हातारगाव) यांनी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थागुशा पथकाने यातील सुनील खिल्लारे यास ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दोघांनी मोबाइल चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता मागील वर्षभरापासून औंढा ते वसमत महामार्गावरील ढाब्यावर मुक्कामी थांबलेल्या ट्रकच्या कॅबिनमध्ये चढून चालक व क्लिनर यांच्या मोबाइलसह किमती सामान दोघांनी चोरल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सुनील खिल्लारे यास ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन लाख ८९ हजार रुपयांचे ३३ ॲड्रॉइड मोबाइल जप्त केले तर कैलास शिंदे हा फरार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोड्या, खून केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थागुशाचे पोनि. उदय खंडेराय, पो.उप.नि. के.डी. पोटे, एस.एस घेवारे यांच्या पथकाने केली.
फोटो : 27hnlp12