हिंगोलीत मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 07:38 AM2019-05-03T07:38:45+5:302019-05-03T07:40:25+5:30
सिलिंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक
कुरुंदा (हिंगोली): वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका घरात शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये घरातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.
कुरुंदा येथील सोनाजी आनंदराव दळवी यांच्या यांच्या घरातील सिलिंडरमधून अचानकपणे गळती होऊ लागली. त्यामुळे शेगडी आणि सिलिंडर वेगळे ठेवले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झालेला असल्यानं त्यात उजळ करण्याचा प्रयत्न केला असता, गळती झालेल्या सिलिंडरचा अचानकपणे स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या दुर्दैवी घटनेत पती सोनाजी आनंदराव दळवी (वय 55), पत्नी सुरेखा सोनाजी दळवी (वय 50), मूलगी पूजा सोनाजी दळवी (वय 23) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
सिलिंडरचा स्फोट झाल्यानं लागलेल्या आगीत संपूर्ण घराचा कोळसा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत घराला लागलेली आग विझवली. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. सकाळी सहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.