तीन लाखांची लाकडे नेणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:28 AM2018-03-21T00:28:58+5:302018-03-21T11:22:31+5:30
तालुक्यातील सिद्धेश्वर शिवारातील काळापाणी तांडा येथील मालकीच्या शेतातील लाकडे वाहतूक करणारा टेम्पो औंढा वन विभागाने पंचनामा करून जप्त केला आहे.
औंढा नागनाथ/ सिद्धेश्वर नंदगाव : तालुक्यातील सिद्धेश्वर शिवारातील काळापाणी तांडा येथील मालकीच्या शेतातील लाकडे वाहतूक करणारा टेम्पो औंढा वन विभागाने पंचनामा करून जप्त केला आहे. वाहनासह ३ लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती देण्यात आली आहे.
काळापाणी तांडा शेतातील लिंब, धावंडा, टेंभूर्णी इत्यादी प्रकारची लाकडे टेम्पो क्र. एम.एच.१२- ३६२ मध्ये भरून सिद्धेश्वर नंदगाव रस्त्यावरून वृक्षाची कत्तल करून वाहतूक करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी रितेश भैराणे, वनरक्षक एन.एस. तायडे, बी.एस. जाधव यांनी पकडून पंचनामा केला. वाहनचालक शेख मुख्तार नूर यांच्यासह वृक्षाची कत्तल करून अवैधरीत्या वाहतूक करताना टेम्पो पकडल्याने वृक्ष तोडणाऱ्या मंडळीस चांगलीच चपराक बसली आहे. वन विभागाच्या अशा प्रकारच्या कार्यवाहीमुळे परिसरात वृक्षतोडीवर नियंत्रण बसेल, अशी चर्चा होत आहे.