भरधाव कारने दुचाकीवरील तिघा वेटरला उडवले; ५०० मीटर फरफटत नेल्याने दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:17 PM2024-10-21T12:17:14+5:302024-10-21T12:18:07+5:30
पुसेगाव फाट्यावर चारचाकीच्या धडकेत दोघे जागीच ठार, एकजण गंभीर जखमी
- सतीश घनमोडे
पुसेगाव (जि. हिंगोली ):- हिंगोली सेनगाव रोडवरील पुसेगाव पाटीजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा जागीची मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीस नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
पुसेगाव येथील गौतम धाबे, शेख सत्तार आणि बबन धाबे हे पुसेगाव पाटीवरील एका ढाब्यावर वेटर म्हणून कामाला होते. रोजच्याप्रमाणे तिघे आपले काम संपवून रविवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान सेनगावकडून हिंगोलीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर दुचाकीला चारचाकी गाडीने फरफटत पाचशे मिटर पर्यंत नेले. त्यामध्ये दुचाकीवरील गौतम धाबे (वय ४८) आणि शेख सत्तार (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बबन धाबे हे गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती कळताच नरसी पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत कुणावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिस चारचाकी वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
वेगाला आवर बसणे गरजेचे...
मागच्या काही दिवसांपासून अति वेगाने वाहने चालविण्याची स्पर्धा लागली आहे. उपप्रादेशिक विभागाने वेगाने जाणाऱ्या वाहनांवर वेळीच कारवाई करावी व वाहनाचा वेग कमी करण्यास भाग पाडावे, अशी मागणी पुढे येत आहे.