हिंगोलीत भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार, जखमी अवस्थेत स्वतः कार चालवत गेले रुग्णालयात
By विजय पाटील | Published: August 1, 2023 03:45 PM2023-08-01T15:45:27+5:302023-08-01T15:46:10+5:30
हल्लेखोरांनी समोरासमोर चार गोळ्या धाडल्या, यातील दोन गोळ्या त्यांना लागल्याची माहिती आहे
हिंगोली : येथील जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त आलेल्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. चार पैकी दोन गोळ्या त्यांच्या पाठित लागल्याचे सांगितले जात आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेत कामानिमित्त पप्पू चव्हाण आले होते. ते ३ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून जिल्हा परिषदेच्या आवारात आले. त्यावेळी तेथे असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. ते बचावासाठी खाली वाकले. त्यामुळे दोन गोळ्या त्यांच्या पाठित घुसल्या, असे प्रत्यक्षदर्शनीने सांगितले. तर दोन गोळ्या प्रांगणात जमिनीवर पडल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. तर पप्पू चव्हाण यांना उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तेथेही भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने गर्दी करीत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह अधिकाऱ्यांचा मोठा ताफा जमला होता.
हिंगोली: येथील जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त आलेल्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. pic.twitter.com/OdhHnhv7Xi
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 1, 2023
स्वतः कार चालवत रुग्णालयात
पप्पू चव्हाण यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर त्यांना पाठीत दोन गोळ्या लागल्या. तरीही त्यांनी त्याच अवस्थेत कार चालवत एक खाजगी रुग्णालय जवळ केले. या रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
नांदेडला हलविले
जखमी अवस्थेतील पप्पू चव्हाण यांना हिंगोली येथून नांदेडच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांना येथील रुग्णालयातून हलवीत असताना आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे आदींसह शेकडो भाजप कार्यकर्ते रुग्णालयासमोर जमले होते.