जिल्हा रुग्णालयात वर्षभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:35 AM2021-02-17T04:35:55+5:302021-02-17T04:35:55+5:30
हिंगोली : जननी सुरक्षा कार्यक्रमाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालामध्ये नि:शुल्क प्रवास व प्रसूतीमुळे माता मृत्यूचे प्रमाण कमी होत ...
हिंगोली : जननी सुरक्षा कार्यक्रमाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालामध्ये नि:शुल्क प्रवास व प्रसूतीमुळे माता मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. येथील जिल्हा रुग्णालयात एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ यादरम्यान ३ हजार ६१५ एकूण प्रसूती झाल्या, यामध्ये ४ महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यामध्ये जननी शिशू सुरक्षा सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे मातांना रुग्णालयापर्यंतचा नि:शुल्क प्रवास तसेच प्रसूतीमुळे शहरी व ग्रामीण भागात तफावत दूर होत आहे. तसेच सरकारी व खाजगी रुग्णालयाचा समावेश, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदरपणातील तपासण्या, स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला, त्यांची वाढलेली उपलब्धता, जोखमीच्या प्रसूतीवर लक्ष ठेवणे आदींचा सकारात्मक परिणाम माता मृत्यू रोखण्यावर झाल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या १० महिन्यांच्या काळात जिल्हा रुग्णालयात ३ हजार ६१५ महिला प्रसूती झाल्या. यामध्ये ८०५ महिलांचे सिझर करावे लागले. तर २ हजार ८१० महिलांची नैसर्गिक प्रसूती झाली. या दहा महिन्यांमध्ये महिलांच्या मृत्यूचे प्रमाण ४ होते. तर दोन महिलांची प्रसूती काही कारणांमुळे लांबली होती.
जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ ७, परिचारिका ८, तर सेवकांची संख्या ४ आहे. जिल्हाभरातून प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची योग्यरीत्या काळजी घेतली जाते. प्रसूती झाल्यानंतर वेळेच्या वेळी आहार दिला जातो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शिवाजी पवार, व अतिरिक्त शल्यचिकित्सक डाॅ. मंगेश टेहरे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
स्त्री रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिकांच्या माध्यमातून प्रसूतीसाठी आलेल्या मातांना योग्य व वेळेवर उपचार दिला जातो. तसेच जास्तीत जास्त मातांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न केला जातो. तसेच रुग्णालयाच्या वतीने गरोदर मातांना सोनोग्राफीसह योग्य मार्गदर्शनही केले जाते.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली
अति रक्तस्राव माता मृत्यूसाठी कारणीभूत
हिंगोली जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गरोदर माता प्रसूतीसाठी येत असतात. मात्र, काही मातांचे बाळ बाहेर येण्यास उशीर होणे, अति रक्तस्राव, निदान न होणारा रक्तस्राव यासह विविध कारणांनी काही मातांना मृत्यूला सामोरे जावे लागते. अति रक्तस्राव मातांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे.