लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकचे टायर फुटले; रस्त्यावर उलटल्यानंतर पेट घेतल्याने वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 20:36 IST2024-07-19T20:35:22+5:302024-07-19T20:36:13+5:30
भररस्त्यावर ट्रक पेटल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला.

लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकचे टायर फुटले; रस्त्यावर उलटल्यानंतर पेट घेतल्याने वाहतूक ठप्प
- रमेश कदम
आखाडा बाळापूर: नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर आखाडा बाळापूरनजीकच्या पिंपरी फाटा येथे लाकडे वाहून नेणारा ट्रक उलटला. उटलेल्या ट्रकला काही वेळातच आग लागली. त्यात लाकडे असल्याने रस्त्यावरील आग भडकली. यानंतर महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.
नांदेड येथून निघालेला ट्रक हिंगोलीकडे जात होता. (आयशर पिक अप क्र.एम. एच. 17 की 5935 ) सायंकाळी ७:२० मिनिटाच्या सुमारास पिंपरीफाटा येथे अचानक ट्रकचे टायर फुटले. मोठा आवाज होवून ट्रक रस्त्यावरच उलटला. ट्रक उलटल्यानंतर त्यातील चालक रसूल खान सिकंदर खान पठाण या.हिंगोली व क्लिनर शेख हानिफ शैख लाल रा. गारमाळ ता. जि. हिंगोली यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात क्लिनरला गंभीर दुखापत झाली. तेवढ्यात रस्त्यावरच ट्रकने पेट घेतला. आत लाकडे असल्याने आग वेगाने भडकली. भररस्त्यावर ट्रक पेटल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला.
दरम्यान, माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग वाहतूक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक खोंडकर, पोलीस जमादार सोपान थिटे , गजानन ढाले, सचिन खूटे , प्रवीण राठोड तातडीने घटनास्थळी पोहोचले .जखमींना मदत केली. त्यांनी कळमनुरी येथील अग्नीशामक दलाला पाचारण केले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात अग्नीशामक दलाला यश आले. जखमी क्लिनरला बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. बाळापुर नजीक ही घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.