आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून दिसणार
By यशवंत भीमराव परांडकर | Published: November 8, 2022 01:27 PM2022-11-08T13:27:16+5:302022-11-08T13:28:45+5:30
मागच्या १५ दिवसांत होणारे हे दुसरे ग्रहण असून हे भारतातही दिसणार आहे.
हिंगोली: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज कार्तिक पौर्णिमेला खंडग्रास स्थितीत होणार आहे. हे चंद्रग्रहण मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाहता येणार आहे, अशी माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर यांनी दिली.
मागच्या १५ दिवसांत होणारे हे दुसरे ग्रहण असून हे भारतातही दिसणार आहे. उत्तर, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागरात देखील दृश्यमान होणार आहे. यावेळी चंद्रग्रहण सुरु असतानाच पूर्व क्षितिजावर चंद्र उगवणार आहे. त्यामुळे या ग्रहणाला 'ग्रस्तोदित' चंद्रग्रहण असेही म्हंटले आहे.
चंद्रग्रहण काही उपकरणांचा आधार न घेता पाहणे शक्य होणार आहे. त्यामुळे डोळ्यांना आनंद मिळणार आहे. हे चंद्रग्रहण प्रथम नांदेड, नंतर हिंगोली येथे सायंकाळी ५:४२ वाजता तर सर्वात शेवटी औरंगाबाद येथे सायंकाळी ५:५० वाजता चंद्रोदयग्रहण स्थितीतच होईल. आपल्याकडे ग्रहण कमाल ग्रासण्याची वेळ ही ५:५७ वाजता असणार आहे. यावेळेस पृथ्वीच्या दाट छायेत चंद्र साधारणत: नांदेड व हिंगोली येथे सर्वात जास्त ५२ टक्के तर औरंगाबाद येथे सर्वात कमी ३३ टक्क्याने ग्रासलेला पहायला मिळेल. सायंकाळी ६:१९ दरम्यान चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीतून विरळ छायेत प्रवेश करणार आहे. सायंकाळी ७:२६ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.
औरंगाबाद येथे ग्रहण दर्शन...
ग्रस्तोदित चंद्रग्रहण दर्शन या खगोलीय उपक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत गोगाबाबा टेकडीवरून केले जाणार आहे.