‘मातोश्री’भेट ठरतेय चर्चेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:51 AM2019-03-06T00:51:46+5:302019-03-06T00:52:01+5:30
लोकसभेची जागा शिवसेनेला सुटणार हे नक्की झाल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्षातीलही काहींनी मुंबईत मातोश्रीवर भेट देत उमेदवारीची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभेची जागा शिवसेनेला सुटणार हे नक्की झाल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्षातीलही काहींनी मुंबईत मातोश्रीवर भेट देत उमेदवारीची मागणी केली. दररोज घडणाऱ्या या घडामोडींची तर चर्चा होतेच. मात्र शिवसेनेच्या नेत्यांची प्रत्येक भेटही वादंगाला तोंड देणारी अथवा नवी चर्चा निर्माण करणारी ठरत आहे. आज पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याच्या वावड्या उठल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती.
समाजमाध्यमांवर होणाऱ्या चर्चा आता प्रत्येकच पक्षाला डोकेदुखी ठरत आहेत. शिवसेनेचे डॉ.जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी मिळाल्याने वसमतमध्ये आतषबाजी झाल्याचे फोटो व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला. तर दुसरीकडे डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील, आ.नागेश पाटील, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अंकुश आहेर आदी मंडळी मात्र मुंबईत मातोश्रीवर गेली होती. त्यांनी तेथे पक्षप्रमुखांशी चर्चा केली. तेथे अजूनही कोणालाच अंतिम उमेदवारीचा शब्द मिळाला नाही. फक्त तेथे सर्वांनी एकत्र काढलेल्या छायाचित्रावरूनच अनुमान लावत उमेदवारीच्या वाºयावरील गप्पांना ऊत आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा उमेदवारी अजून निश्चित नाही. केवळ दिलेल्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेशच मिळाल्याचे सांगताना शिवसेना नेत्यांना कसरत करावी लागली.
या सर्व बाबींमध्ये आ.मुंदडा यांचे नाव मात्र अंतिम मानले जात आहे. काही शिवसैनिक तर जणू उमेदवारी जाहीर झाल्याप्रमाणेच सांगत आहेत. मात्र मुंदडा यांचा गट अजूनही सावध भूमिकेतच आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कळेल, असे सांगत आहे.
सेनाच लक्ष्य
समाजमाध्यमांवर शिवसेनाच वारंवार का लक्ष्य ठरत आहे, हे कळायला मार्ग नाही. यामध्ये सेनेतील अंतर्गत गटबाजी कारणीभूत आहे की, वाढलेली इच्छुकांची संख्या, हे कळायला मार्ग नाही. मात्र सेनेच्या बाबतीतच अफवांचा बाजार कायम गरम राहत असल्याने ही बाब चिंतेची बनली आहे.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. त्यात हिंगोली लोकसभेच्या उमेदवारीच्या इच्छुकांबाबत चर्चा झाली. तर जो उमेदवार दिला जाईल, त्याचे काम करा असा आदेश त्यांनी दिला. अजून उमेदवारी अंतिम झाली नाही, असे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.
अफवा पसरविल्या जाताहेत-आहेर
सेनेची उमेदवारी जाहीर झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अजून उमेदवारी निश्चित झाली नाही, असे औंढा तालुकाप्रमुख अंकुश आहेर यांनी सांगितले.