पूर्णा कारखाना मार्गावर ट्रॅक्टर उलटले;चालक जागीच ठार
By विजय पाटील | Published: November 22, 2023 06:43 PM2023-11-22T18:43:31+5:302023-11-22T18:46:46+5:30
या अपघातामुळे बाभूळगाव ते वसमत मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
हिंगोली: वसमत तालुक्यातील बाभुळगाव ते पूर्णा कारखाना मार्गावर बुधवारी ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. या अपघातात चालकाचा ट्रॅक्टरच्या हेडखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली.
वसमत तालुक्यातील बाभूळगाव ते पूर्णा सहकारी साखर कारखाना मार्गावर २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वा दरम्यानात कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर अचानक उलटले. या अपघातात ट्रॅक्टर चालक रावसाहेब कदम (वय ३७,रा. धानोरा, ता पूर्णा, जि. परभणी) हे ट्रॅक्टरच्या हेडखाली आले. यात त्याचा हेडखाली दबून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातामुळे बाभूळगाव ते वसमत मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती कळताच लक्ष्मीकांत नवघरे यांनी जेसीबी बोलावून मार्गावरील वाहतूक सुरळीत करुन दिली. घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, जमादार उपरे, अजय पंडित यांनी भेट देऊन पंचनामा केला.
दिवसा व रात्री प्रवास जपून करावा...
सध्या वसमत भागातील ऊस कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. मार्गावर दिवसरात्र ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर व ट्रक यासह बैलगाड्या धावत आहेत. कोणताही अपघाता घडणार नाही याची वाहनधारकांनी काळजी घेत प्रवास करावा. रात्री वाहने सावकाश चालवावी.
- अनिल काचमांडे, सपोनि ग्रामीण वसमत