सेनगावात व्यापाऱ्यांचे घर फोडले; ९ लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 07:19 PM2019-08-08T19:19:20+5:302019-08-08T19:24:01+5:30
काही दिवसांपासून घर बंद होते
सेनगाव (हिंगोली ) : घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी येथील आजेगाव रस्त्यावरील कापड व्यापाऱ्यांचे घर फोडून सोने-चांदी दागिने व रोख रक्कम असा एकूण ९ लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.
शहरातील आजेगाव रस्त्यावर अनिल श्रीराम साबु या कापड व्यापाऱ्यांचे घर आणि दुकान आहे.मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर त्याचे घर आहे. प्रकृती ठिक नसल्याने साबु हे ४ ऑगस्टपासून उपचारासाठी कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुकान आणि घर कुलूप बंद होते. चोरट्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलत घराचे प्रवेशद्वार तोडून चोरी केली. पाळत ठेवून करण्यात आलेली चोरी गुरुवारी सकाळी साबु याचा मुलगा अंकित घरी आला तेव्हा निदर्शनास आली.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक सरदार सिंग ठाकूर ,फौजदार बाबुराव जाधव यांनी भेट देवून पंचनामा केला. शहरात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. व्यापारी सत्यनारायण झवर यांच्या वरील प्राणघातक हल्लातील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. यातच आता चोरीची मोठी घटना घडली आहे.