पारंपरिक शेती ? छे ! पाच एकरात उभारला ड्रीम प्रोजेक्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:05 PM2018-11-20T12:05:16+5:302018-11-20T12:10:01+5:30
यशकथा : तरुण शेतकऱ्याने पाच एकर शेती पूर्णपणे व्यवसायासाठी वापरण्याच्या उद्देशाने वेगवेगळे तीन व्यवसाय सुरू करून आपला ड्रीम प्रोजेक्ट उभा केला आहे.
- विश्वास साळुंके ( वारंगा फाटा, हिंगोली )
पारंपरिक शेतीला फाटा देऊन कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील तरुण शेतकऱ्याने पाच एकर शेती पूर्णपणे व्यवसायासाठी वापरण्याच्या उद्देशाने वेगवेगळे तीन व्यवसाय सुरू करून आपला ड्रीम प्रोजेक्ट उभा केला आहे. पारंपरिक शेती करीत असताना अनेकदा उत्पन्न कमी खर्च अधिक, अशी स्थिती होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील गजानन मारोती उदगिरे या ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतीतच ड्रीम प्रोजेक्ट उभा करण्याची आस घेतली.
शेती ही शेतीच न ठेवता तिचा पूर्णपणे व्यवसायाकरिता वापर करून विविध व्यवसाय चालू करण्याचा प्रस्ताव कुटुंबियांसमोर ठेवला. कुटुंबियांनीदेखील त्यास संमती दर्शविली आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. सर्वप्रथम गजानन यांनी गावरान १५ शेळ्या ९० हजार रुपयांना विकत घेतल्या व बारा हजार रुपयांत उस्मानाबादी जातीचे बोकड विकत आणले. केवळ शेळीपालनावर न थांबता गावरानी कोंबड्यांचे कुक्कुटपालन करण्यासाठी त्यांनी २०० रुपये प्रतिपिल्लू याप्रमाणे दहा हजार रुपयांची ५० गावरान कोंबड्यांची पिल्लं खरेदी केली आणि शेळीपालन व कुक्कुटपालन सुरू केले. ५० बाय ३२ फुटांचे पत्र्यांचे शेड उभारण्यासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला.
सुरुवातीला त्यांनी शेळ्या व कोंबड्यांची पिल्लं खरेदी केल्यानंतर त्यातच शेळ्यांनी दिलेली पिल्लं व कोंबडीच्या अंड्यांपासून तयार केलेली पिल्लं यांची वाढ केली. सुरुवातीपासून कुठलीही खरेदी केली नसल्याचे गजानन उदगिरे यांनी सांगितले. शेळ्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी शेतात रासायनिक खताचा वापर बंद करून संपूर्ण शेतात शेळ्यांच्या लेंडीखताचा वापर सुरू केला. परिणामी त्यांचे दरवर्षी रासायनिक खतासाठी लागणारे लाखो रुपये वाचले. त्यांना एकूण पाच एकर जमीन असून, दोन एकरात ऊस आहे. ऊस गेल्यानंतर संपूर्ण शेती ही शेळ्यांसाठी लागणाऱ्या चाऱ्याकरिता वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यवसायाबरोबर शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून १५ गुंठ्यांत शेततळे तयार केले. त्यामध्ये पाणी भरून घेतल्यानंतर त्यांनी ५ हजार नग मत्स्यबीज सोडले. त्यासाठी तीन हजार रुपये खर्च आला. आतापर्यंत शेळ्या, कोंबड्यांची पिल्लं, शेड, मत्स्यबीज व खाद्य यासाठी गजानन यांना चार लाख रुपये खर्च आला. यापुढे त्यांना अधिक खर्च लागणार नसून विक्रीस तयार असलेल्या १० बोकड, ४०० कोंबड्या व अंडे आणि मासळींपासून त्यांना पुढील दोन महिन्यात चार लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. आज रोजी २० शेळ्या, १८ बोकड, १८ शेळ्यांची पिल्लं, ४०० कोंबड्या आणि मासळी विक्रीसाठी तयार आहे. यापैकी १० बोकड विक्रीसाठी, कोंबडी, अंडी विक्रीसाठी उपलब्ध असून, गावरान अंड्यांना हिवाळ्यात चांगली मागणी असल्याने दररोज किमान ३०० रुपयांची नगदी स्वरुपात अंडी विक्री करतात.