रेल्वेचे गेट न उघडल्याने दीड तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:59+5:302021-07-09T04:19:59+5:30
हिंगोली येथील खटकाळी रेल्वे गेटच्या समस्येमुळे या ठिकाणी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची मुदत संपूनही कोरोनाच्या ...
हिंगोली येथील खटकाळी रेल्वे गेटच्या समस्येमुळे या ठिकाणी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची मुदत संपूनही कोरोनाच्या नावाखाली हे काम मागील दीड वर्षापासून सुरूच आहे. हा पूल कधी उभा राहील, ही समस्या समोर असताना आहे ते रेल्वेचे गेटच उघडत नसल्याची समस्याच गंभीर बनली आहे. आज रेल्वेचे महाप्रबंधक गजानन माल्या हिंगोलीत असताना रेल्वे विभागाला गेटबाबत किती गांभीर्य होते, हे समोर आले आहे. सायंकाळी चारच्यासुमारास हे गेट उघडत नसल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काहीजणांनी तर खूप उशीर लागत असल्याने दुसऱ्या बाजूने असलेल्या सिमेंट रस्त्यावर वाहन नेऊन तेथून थेट रेल्वे पटरी ओलांडण्याचा जीवघेणा धोका पत्करल्याचेही दिसत होते. आधीच रेल्वेच्या कामामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूंनी कच्चा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे. पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने खड्ड्यांची डागडुजी करण्याचीही साधी तसदी घेतली नाही. त्यामुळे या खड्ड्यांत दुचाकीचालक घसरून पडत आहेत. एखाद्याचा बळी गेल्याशिवाय रेल्वे विभाग अथवा या कंत्राटदाराला जाग येईल, असे दिसत नाही. त्यात रेल्वे गेटची समस्या अशीच गंभीर होत राहिली, तर या ठिकाणाहून एखादा गंभीर रुग्ण नेण्याचा धोका जिवावर बेतणारा ठरू शकतो.
नागरिकांनी उचलले गेट
हे गेट अनेकदा प्रयत्न करूनही यंत्रणेकडून उचलले गेले नाही. शेवटी या ठिकाणच्या नागरिकांची मदत घेऊन ते वर उचलण्यात आले. आधीच हा प्रयत्न केला असता, तर कदाचित वाहतुकीचा खोळंबा झाला नसता. मात्र नादुरुस्त यंत्रणेच्या भरवशावर बसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी ती तसदी घेतली नाही.