बोगीला आग लागली, पण मॉक ड्रील होती; हिंगोली रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:45 IST2025-04-22T18:44:28+5:302025-04-22T18:45:08+5:30
अचानक आगीसारखी किंवा अन्य दुर्घटना घडली तर काय करावे, रेल्वेसह इतर यंत्रणा सतर्क आहेत, याची पडताळणी करण्यात आली

बोगीला आग लागली, पण मॉक ड्रील होती; हिंगोली रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला
हिंगोली : शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वे बोगीतून अचानक धुराचे लोट उडतात, रेल्वेच्या अपघात राहत पथकासह सर्व संबंधितांना संदेश दिला जातो, सायरन वाजवत शहराच्या मुख्य रस्त्याने अग्नीशमनची गाडी रेल्वेस्थानकावर पोहोचते, पूर्णा येथून अपघात निवारण रेल्वे व इतर पथके दाखल होतात, आग विझविण्याची धावपळ होते. रेल्वेस्थानकाच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमते. काय झाले, कोणालाच कळत नाही. काही वेळानंतर हे रेल्वेचे मॉक ड्रील (प्रात्याक्षिक) होते, असे समजल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडतो.
अचानक आगीसारखी किंवा अन्य दुर्घटना घडली तर काय करावे, रेल्वेसह इतर यंत्रणा सतर्क आहेत, याची पडताळणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मंगळवारी सकाळी हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर उभ्या रेल्वेच्या एका बोगीला आग लागल्याचा संदेश रेल्वे प्रशासनातील सर्व विभागांना पाठविण्यात आला.
या प्रात्यक्षिकादरम्यान हिंगोली येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये बंद असलेल्या रेल्वे डब्यामध्ये प्रवासी अडकल्याची माहिती मिळताच अपघात निवारण ट्रेनच्या (एआरटी) साह्याने पूर्णा येथून टीम मदतीसाठी धावली. त्याच वेळी रेल्वे आपत्कालीन नियंत्रण कक्षाची (एनडीआरएफ) टीमही दाखल झाली. दोन्ही टीमने बचाव कार्य सुरु केले तसेच विशेष उपकरणांच्या साह्याने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. ही पूर्णत: तांत्रिक मॉक ड्रील हिंगोलीच्या रेल्वेस्थानकावर राबविण्यात आली.
तसेच हिंगोली नगरपालिकेच्या अग्नीशमन विभगाला माहिती मिळताच अग्नीशमनचे दोन बंब तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. अत्यावश्यक सुविधेत असणाऱ्या इलेक्ट्रीक विभागाचे पथकही दाखल झाले. साधारणत: ९.१५ च्या सुमारास आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर रेल्वेच्या बोगीत असणाऱ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठीचेही प्रात्याक्षिक करण्यात आले.
रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या या प्रकाराविषयी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मात्र काहीच माहिती नव्हती. त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह पथकही या ठिकाणी सज्ज होते. दरम्यान काही वेळाने रेल्वेने हे प्रात्याक्षिक घेतले असल्याची माहिती समजल्यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या पथकांनी घेतला सहभाग
या मॉकड्रीलमध्ये नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागाने स्वयंचलित अपघात निवारण गाड्या, ५ वी बटालीयन, एनडीआरएफ ५ आय टीम, कॅरेज ॲण्ड वॅगन कर्मचारी, रेल्वे नागरी सुरक्षा दल, रेल्वे संरक्षण दल, स्काऊट, गाईड, महाराष्ट्र राज्य पोलिस, वैद्यकीय पथक, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन कर्मचारी, विद्युत कर्मचारी, अभियांत्रिकी कर्मचारी, स्वयंचलित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन (एसपीएआरएमव्ही) या पथकांनी सहभाग नोंदविला. हिंगोली नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागातील १० ते १५ कर्मचारी, इलेक्ट्रीक विभागाचे कर्मचारी, महसूलचे कर्मचारी आदींनी सहभाग नोंदविला.
या अधिकाऱ्यांची उपस्थिती
दक्षिण मध्य रेल्वेचे प्रधान सुरक्षा अधिकारी व्यंकट रमणा रेड्डी, मुख्य रोलिंग स्टॉक इंजिनिअर धर्मेंद्र, रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्यासह नांदेड येथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.