उपचार दूरच, घाणअन् दुर्गंधीनेच रुग्ण हैराण; आ. मुटकुळेंनी रुग्णालय प्रशासनाला धरले धारेवर
By रमेश वाबळे | Published: August 14, 2023 05:30 PM2023-08-14T17:30:33+5:302023-08-14T17:31:34+5:30
हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी भेट दिली.
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पिण्याच्या पाण्यावरूनही रुग्णांमध्ये ओरड सुरू आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचाराआधी घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने नाराजी पुढे येत आहे. यावरून १४ ऑगस्ट रोजी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात असलेल्या रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सेवेची चौकशीही केली. यादरम्यान काही रुग्णांनी पिण्याच्या पाण्यावरून नाराजी व्यक्त केली. काही वेळा पाणी उपलब्ध नसल्यामुळे विकत आणावे लागत असल्याचे सांगितले. तसेच आरोग्यसेवेबाबतही तक्रारी केल्या. यादरम्यान रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आजारापेक्षा घाण आणि दुर्गंधीचाच अधिक त्रास होत असल्याचे म्हणणे रुग्णांच्या नातेवाइकांनी आ. मुटकुळे यांच्याकडे मांडले. त्यावर रुग्णालयातील स्वच्छता, पाणीप्रश्न तसेच आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार मुटकुळे यांनी केल्या. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणीही केली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. बालाजी भाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
रस्ताकामासाठी अंदाजपत्रक तयार करा...
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी गिट्टी उखडली असून, काही ठिकाणी पावसाचे पाणीही साचत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते तर काही भागात पेवर ब्लाॅक बसविणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर आमदार मुटकुळे यांनी रस्त्याची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.