बाळापूर परिसरातील १९८ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:29 AM2021-04-24T04:29:59+5:302021-04-24T04:29:59+5:30
आखाडा बाळापूर: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागात त्याचा चांगलाच प्रसार झाला आहे. बाळापूर परिसरातील १९८ कोरोना बाधित ...
आखाडा बाळापूर: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागात त्याचा चांगलाच प्रसार झाला आहे. बाळापूर परिसरातील १९८ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गंगाधर काळे यांनी दिली.
आखाडा बाळापूर व परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरी भागाच्या रुग्णांकडे पाहता ग्रामीण भागातील नागरिकांवर कोरोनाने आघात केला आहे. बाळापूर परिसरातील अनेक खेड्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गंगाधर काळे यांनी या रोगाच्या प्रसाराबाबत व संभाव्य धोक्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
नागरिकांनी आजार लपवू नये...
बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात २२०७ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आहे.तर ३४९० नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये १९८ बाधित रुग्ण आढळले. उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी व जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आखाडा बाळापुर, कांडली, सालापुर,वारंगा, दिग्रस, कोंढूर, डोंगरकडा, जवळा पांचाळ, कामठा, जरोडा, दाती, कवडी या गावांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग असल्याचेही डॉ. काळे यांनी सांगितले. नागरिकांनी कोणताही आजार अंगावर न काढता आपली चाचणी करून घ्यावी व योग्य ते उपचार करुन घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.