तलवारीच्या धाकावर ट्रक चालकास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:37 AM2018-12-10T00:37:27+5:302018-12-10T00:37:47+5:30
शहरातील लमानदेव मंदिराजवळ नादुरूस्त झालेल्या ट्रक चालकाला मोटारसायकलवरील दोघांनी तलवारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना ९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. चालकाकडील आरोपींनी एक मोबाईल व नगदी तीन हजार रुपये लंपास केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : शहरातील लमानदेव मंदिराजवळ नादुरूस्त झालेल्या ट्रक चालकाला मोटारसायकलवरील दोघांनी तलवारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना ९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. चालकाकडील आरोपींनी एक मोबाईल व नगदी तीन हजार रुपये लंपास केले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली-नांदेड राष्टÑीय महामार्ग १६१ च्या कळमनुरी शहरातील लमान देव मंदिर परिसरात ट्रक क्र. आरजे- ०९ जीबी-९५९३ हा नादुरूस्त झाल्याने ट्रक चालक जावेद शेख अनवर रा. मंदसोर मध्यप्रदेश हे रस्त्याच्या कडेला झोपले होते. ९ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर तेथे आले. व त्यांनी आम्हाला नांदेडला घेवून चल, असे म्हणाले. त्यावर क्लिनरने सांगितले की, ट्रक नादुरूस्त असल्याने घेऊन जावू शकत नाही, असे सांगतले. आरोपी ट्रकच्या कॅबीनमध्ये चढले. यावेळी ट्रक चालकास व अन्य दोघांना आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून मोबाईल व पाकीटामधील रोख ३ हजार रुपये काढून पसार झाले. असे ट्रक चालक शेख जावेद यांनी सांगितले.
याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी दिली. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तलवारीच्या धाकावर ट्रकचालकास लुटल्याच्या या खळबळजनक घटनेमुळे मात्र येथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.