पार्डीमोड वळणावर ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:40+5:302021-02-12T04:27:40+5:30

कळमनुरी : तालुक्यातील पार्डीमोड वळणावर एक मालवाहू ट्रक उलटल्याची घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी घडली यामध्ये काही जीवितहानी झाली ...

The truck overturned at the Pardemode turn | पार्डीमोड वळणावर ट्रक उलटला

पार्डीमोड वळणावर ट्रक उलटला

Next

कळमनुरी : तालुक्यातील पार्डीमोड वळणावर एक मालवाहू ट्रक उलटल्याची घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी घडली यामध्ये काही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मालवाहू ट्रकमध्ये टॉवरला वापरण्यात येणारी अँगल होते. अपघातानंतर लोखंडी अँगल ट्रकच्या बाहेर जाऊन पडले. काही दिवसांपूर्वी आखाडा बाळापूर परिसरात असाच टाॅवरच्या अँगलची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन त्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

तुरीच्या उत्पादनात घट

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीचे पीक घेतले होते. आता बहुतांश शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली आहे. मात्र तुरीच्या उत्पादनात घट होत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे तुरीच्या पेरणीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यापूर्वी कापसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सावरगाव परिसरात खड्डे

हिंगोली : तालुक्यातील सावरगाव परिसरात हिंगोली ते नांदेडरोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सावरगावाजवळ पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुलाजवळ सुरक्षेसाठी कठडे तयार करण्यात आले आहेत. त्यात हे खड्डे पडल्याने रस्ता धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून होत असलेली वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सावरगाव परिसरातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

नवीन खांब बसवा

कळमनुरी : तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ग्रामीण भागात विजेचे खांब बसवून त्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. वीज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाची पिके घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत. परिणामी वीजतारा लोंबकाळून एकमेकांना घासत आहेत. यातून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे वाकलेले विजेचे खांब काढून त्या ठिकाणी नवीन खांब बसवावेत, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावरच उभी करताहेत खासगी बस

वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथून हदगाव, नांदेड, हिंगोलीकडे मार्ग जातो. त्यामुळे वाहनांची वर्दळ कायम असते. मात्र अनेकवेळा खासगी बसेस मुख्य रस्त्यावरच उभी केली जात आहेत. रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने इतर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याचा फटका रुग्णवाहिकेलाही बसत आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

रोहयोची कामे सुरू करा

हिंगोली : ग्रामीण भागातील बहुतांश कामे आता उरकत आले आहेत. आणखी १५ ते २० दिवस मजुरांना शेतातील कामे मिळतील, अशी परिस्थिती आहे. १५ ते २० दिवसांनंतर कामे उपलब्ध होणार नसल्याने अनेक मजूर आता मोठ्या शहराकडे स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. तसेच यापूर्वीही काही मजुरांनी स्थलांतर केले आहे. स्थलांतर रोखण्यासाठी गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोहयोची कामे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

तळीरामांचा वावर वाढला

आखाडा बळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकात सायंकाळच्या वेळी तळीरामांचा वावर वाढत आहे. रात्री उशिरापर्यंत तळीराम थांबत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन तळीरामांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गतिरोधक ठरताहेत धोकादायक

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील माळेगाव हे मुख्य मार्गावरील गाव आहे. सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा, यासाठी गावाच्या दोन्ही बाजूंनी हिंगोली ते नांदेडमार्गावर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र कळमनुरीच्या बाजूने असलेला गतिरोधक धोकादाय ठरत आहे. हा गतिरोधक रस्त्याच्या मध्यापर्यंतच असल्याने नांदेडकडून येणारी वाहनेही विरुद्ध दिशेने चालविली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन एक तर गतिरोधक काढून टाकावा किंवा गतिरोधक पूर्ण रस्त्यावर बसवावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: The truck overturned at the Pardemode turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.