दोन शासकीय कार्यालयांसह ट्रक जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:35 AM2018-07-28T00:35:29+5:302018-07-28T00:35:48+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथे राष्टÑीय महामार्गावर अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथे आलेल्या आ. रामराव वडकुते यांना भाषण करण्यास मज्जाव केला व तेथून हुसकावले. दाती फाटा येथे एक ट्रक जाळून टाकला. एरिगेशन कॅम्प येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय डिव्हीजन चारमध्येही काही जणांनी तोडफोड केली. पेट्रोल टाकून संगणक संच जाळून टाकले. रस्त्यावर टायर जाळले. झाडे तोडून टाकून रस्ता वाहतूक बंद केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथे राष्टÑीय महामार्गावर अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथे आलेल्या आ. रामराव वडकुते यांना भाषण करण्यास मज्जाव केला व तेथून हुसकावले. दाती फाटा येथे एक ट्रक जाळून टाकला. एरिगेशन कॅम्प येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय डिव्हीजन चारमध्येही काही जणांनी तोडफोड केली. पेट्रोल टाकून संगणक संच जाळून टाकले. रस्त्यावर टायर जाळले. झाडे तोडून टाकून रस्ता वाहतूक बंद केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानकासमोर नांदेड- हिंगोली महामार्गावर तब्बल अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनादरम्यान आ. रामराव वडकुते तेथे आले. भाषणासाठी त्यांचे नाव पुकारताच आंदोलकांनी एकच गोंधळ घालून त्यांना भाषण करण्यास मज्जाव केला. आंदोलक त्यांच्या अंगावर धावून गेले. जमावातून त्यांना पोनि व्यंकटेश केंद्रे, बाबूराव वानखेडे, देवराव पाटील यांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यानंतर आ. वडकुते यांना धक्काबुक्की झाल्याची अफवा पसरली.
दरम्यान, दाती फाटा येथे भर रस्त्यावर एक ट्रक पेटवून दिला ट्रक क्र. आर.जे. ०४ जी.ए. ७१८८ हा ट्रक पूर्ण जळून खाक झाला. आंदोलनस्थळी कळमनुरी अग्नीशमन दलाची गाडी उभी होती. तातडीने गाडी तेथे पाठवली. आग विझवण्याचा प्रयत्न केला. आखाडा बाळापूर येथील एरिगेशन कॅम्प येथे असलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय विभाग क्र. ४ च्या कार्यालयात दहा ते पंधरा जण तोंडाला बांधून आले. तेथे उपस्थित चार ते पाच कर्मचाऱ्यांना तलवारी दाखवून कार्यालयाबाहेर काढले. मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश दिले. कार्यालयाच्या खिडकीच्या काचा, टेबालावरील काचा फोडल्या, सामानाची तोडफोड केली. बाटलीत आणलेले पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात संगणक संच व इतर सामान जळून खाक झाले.
डीवायएसपी शशिकिरण काशिद, पो.नि. व्यंकटेश केंद्रे, सपोनि ओमकांत चिंचोलकर, फौजदार तानाजी चेरलेसह ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी, एस.आर.पी. जवानांची एक तुकडी, राखीव पोलिसांची तुकडी, होमगार्ड असा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवला होता. पण पोलिसांना
पाणी संपले : ट्रक जळून खाक
दाती फाट्यावर ट्रक विझवण्यास कळमनुरी अग्निशमन दलाची गाडी आली. पण गाडीत थोडेसेच पाणी होते. ते तेव्हाच संपले अन् आग सुरूच राहिली. अग्निशमन दलाचा हा भोंगळ कारभार चर्चेचा विषय बनला. ही गाडी शोभेची वस्तू बनलीय. यामुळे पोलिसांनाही डोक्याला हात लावून बसावे लागले.
साळवा फाटा येथे रस्त्यावर झाड तोडून टाकून वाहतूक अडविली. बाळापुरात पेट्रोलपंपाजवळील पुलावर टायर जाळले. रास्तारोकोत गुंतवत ठेवून इतरत्र जाळपोळ, तोडफोड केली. हा गनिमी कावा पोलिसांच्या लक्षात न आल्याने हिंसक घटना घडल्या.
रास्तारोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी फडणवीस सरकारचे श्राद्ध घातले. श्रद्धांजली अर्पण केली. अनेक आंदोलकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त करून आरक्षण द्या, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.
उडी मारली म्हणून जीव वाचला -मो.ताहेर
आखाडा बाळापूर : हैदराबादवरून दिल्लीकडे माल भरून जात असताना दाती फाट्याजवळ आठ ते दहा जणांच्या जमावाने आमची गाडी थांबवली. खाली उतर अशी धमकी देत गाडीच्या काचा फोडायला सुरुवात केली. गाडीची कागदपत्रे घेऊन खाली उतरतो, असे म्हणालो. ही फाईल बाहेर काढेपर्यंत दोघांनी बॉटलमधले पेट्रोल गाडीवर टाकले. थोडेशी माझ्या अंगावरही पडले. मात्र आगपेटीवर काडी पेटत नव्हती. तोपर्यंत मी ट्रकमधून उडी मारली आणि स्वत:चा जीव वाचवला. क्षणार्धात ट्रकने पेट घेतला. आतील मेटलचा मालही जळून खाक झाला, ही घटना सांगितली आहे जळीत ट्रकचा ड्रायव्हर मोहम्मद ताहीर याने. ताहीर हा हरियाणा येथील रहिवासी असून दिल्लीच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये तो ड्रायव्हर म्हणून काम करतो.