सामाजिक समता रुजविण्याचा प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:32 AM2018-04-09T00:32:54+5:302018-04-09T00:32:54+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले. सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ८ एप्रिल रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले. सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ८ एप्रिल रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात केले.
येथील सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन आ. मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, जात पडताळणी उपायुक्त भारत केंद्रे, जात पडताळणी समिती सदस्य सचिव छाया कुलाल, दलितमित्र संघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार, मधुकर मांजरमकर, बबन मोरे, बबन शिखरे, दत्ताराव पाटोळे आणि समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण उपस्थित होते. मुटकुळे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणे व गांभीर्याने नमूद केली आहे. कलम ४६ मध्ये ‘राज्य हे दुर्बल तर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्यायावर सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे सरंक्षण करील’ असे नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दलित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना समानतेचा हक्क प्राप्त करुन दिला असे ते म्हणाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, बबन शिखरे, डॉ. विजय निलावार यांनीही मार्गदर्शन केले. समाज कल्याण सहायक आयुक्त चव्हाण म्हणाले राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले असून, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत अधिकाराची जाणीव असणे आवयश्यक आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन इंगोले यांनी केले. आभार वागतकर यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी नागरिक उपस्थिती होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूतां तर्फे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.समाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समतादूतांकडून सप्ताहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक वाटचाल डीव्हीडी महाविद्यालयात दाखविण्यात येणार आहे. महिलांसाठी (हिंदू कोड बिल) व शेतकºयांसाठीचे योगदान यासह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सप्ताहामध्ये जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, प्रफुल्ल पट्टेबहादूर, शंकर पोघे, सुकेश कांबळे परिश्रम घेत आहेत.