तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

By रमेश वाबळे | Published: January 23, 2024 07:39 PM2024-01-23T19:39:51+5:302024-01-23T19:40:16+5:30

भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे.

Tur fell by 500, soybeans also fell in price; Farmers are disappointed due to fall in prices | तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

हिंगोली : येथील मोंढ्यात १० हजार ३०० रूपयांचा पल्ला गाठलेल्या तुरीच्या दरात मंगळवारी पाचशे रूपयांनी घसरण झाली. तर सोयाबीनही सध्या पडत्या भावातच विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

यंदा सोयाबीनसह तूर, कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. अत्यल्प पाऊस, पिके ऐन भरात असताना किडीचा प्रादुर्भाव यामुळे फटका बसला. उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात तरी समाधानकारक भाव मिळेल अशी आशा होती. मात्र, लागवड आणि उत्पादनाचा विचार केल्यास यंदा सोयाबीन कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. डिसेंबरमध्ये दोन- तीन दिवस सोयाबीनने पाच हजारांचा पल्ला गाठला. परंतु, त्यानंतर तीनशे ते चारशेंनी भाव घसरले. पुन्हा भाव वाढतील अशी आशा होती. मात्र, निराशा होत आहे. सध्या सरासरी ४ हजार ५०० रूपयांवर भाव जात नसल्याचे चित्र आहे.

तुरीला मात्र समाधानकारक भाव मिळत आहे. २० जानेवारी रोजी तुरीला किमान ९ हजार ६५० ते १० हजार ३०० रूपये भाव मिळाला होता. परंतु, उत्पादनात घट झाल्यामुळे या भाववाढीचा फारसा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच मंगळवारी क्विंटलमागे जवळपास पाचशे रूपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत होती.

दोन दिवसांच्या बंदमुळे आवक वाढली...
रविवारी हक्काची सुट्टी आणि सोमवारी अयोध्येतील सोहळ्यानिमित्त बाजार समिती प्रशासनाने मोंढा, मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे मंगळवारी सोयाबीनसह तुरीची आवक वाढली होती. सोयाबीन ८०० क्विंटल तर तुरीची आवक ३०० क्विंटल झाली होती. परंतु, भावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

सोयाबीन दराची कोंडी कायम...
भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असून, भाव वाढीची अपेक्षा आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता कमी असून, मागील तीन महिन्यांपासून दरवाढीची कोंडी कायम असल्याचे चित्र आहे.

Web Title: Tur fell by 500, soybeans also fell in price; Farmers are disappointed due to fall in prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.