हिंगोलीच्या मोंढ्यात तुरीने गाठला ११ हजारांचा पल्ला
By रमेश वाबळे | Published: August 25, 2023 06:40 PM2023-08-25T18:40:44+5:302023-08-25T18:42:16+5:30
उत्पादनात घट झाल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मागील सात महिन्यात मोंढ्यात तुरीची आवक कमीच राहिली.
हिंगोली : अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. परंतु, बाजारपेठेत तुरीला चांगला भाव मिळाला. हिंगोली कृउबाच्या मोंढ्यात २५ ऑगस्ट रोजी तुरीने ११ हजारांचा पल्ला गाठला आहे.
जिल्ह्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४५ हजार ३०६ हेक्टर असताना २०२२-२३ च्या खरीप हंगामात ३८ हजार ४१८ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यातच अतिवृष्टी, किडीचा हल्ला झाल्याने उत्पादन निम्म्या खाली आले होते. त्यामुळे हंगामापासून मोंढ्यात विक्री येणाऱ्या तुरीची आवक कमी राहिली. परिणामी, समाधानकारक भाव मिळाला. प्रारंभी सात ते आठ हजार रूपये क्विंटलप्रमाणे तुरीची विक्री झाली. त्यानंतर आवक कमी होताच दर वधारले आणि जून, जुलैमध्ये तुरीने दहा हजाराचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर आता तुरीच्या दरात आणखी वाढ झाली असून, २५ ऑगस्ट रोजी मोंढ्यात किमान १० हजार ५५० ते कमाल ११ हजार १५० रूपये तुरीला दर मिळाला. या दिवशी ३० क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती.
आवक मंदावताच भाव वधारला...
उत्पादनात घट झाल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मागील सात महिन्यात मोंढ्यात तुरीची आवक कमीच राहिली. त्यामुळे यंदा तुरीला समाधानकारक भाव मिळाला. हंगामात १०० ते १५० क्विंटल तूर विक्रीसाठी येत होती. तर आता केवळ ३० ते ३५ क्विंटल तुरीची आवक होत आहे. त्यामुळे भाव वधारत आहेत.
हरभऱ्याच्या दरात वाढ...
शासनाने हमीभाव केंद्रावर हरभऱ्याला ५ हजार ३३५ रूपये दिला. तर मोंढ्यात आणि खुल्या बाजारात त्यापेक्षाही कमी दर मिळत होता. आता मात्र हरभऱ्याचे दर वाढले असून, २५ ऑगस्ट रोजी १३० क्विंटलची आवक झाली होती. ५ हजार ५०० ते ५ हजार ७५५ रूपये दर मिळाला. तर सरासरी ५ हजार ६२७ रूपये क्विंटलने हरभरा विक्री झाला.
हळदीची १ हजार ८०० क्विंटल आवक...
तीन दिवसांच्या बंद नंतर २४ ऑगस्टपासून हळद मार्केट यार्ड सुरू झाले. पहिल्या दिवशी १ हजार ५०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. तर दुसऱ्या दिवशी २५ ऑगस्ट रोजी १ हजार ८०० क्विंटल हळदीची आवक झाली. सरासरी १५ हजार ६५० रूपये दर मिळाला.