तब्बल १२ दिवसानंतर उद्या हळद मार्केट उघडणार; यार्डात आदल्या दिवशीच वाहनांच्या रांगा
By रमेश वाबळे | Published: April 2, 2024 06:08 PM2024-04-02T18:08:25+5:302024-04-02T18:08:43+5:30
बारा दिवसांच्या बंदनंतर मोंढा, मार्केट यार्डात उद्यापासून शेतमाल खरेदी-विक्री
हिंगोली : येथील बाजार समितीचा मोंढा आणि हळद मार्केट यार्ड मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून बंद ठेवण्यात आले होते. तब्बल बारा दिवसांच्या बंदनंतर ३ एप्रिलपासून या ठिकाणी शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार सुरू होणार आहेत. त्यामुळे मार्केट यार्डात आदल्या दिवशी २ एप्रिलच्या सकाळपासूनच हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सध्या हळद, हरभरा, सोयाबीनसह गहू विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीपासून भुसार मालासह हळदीची आवक वाढली होती. परंतु, २४ मार्चला होळी आणि २५ मार्च रोजी धुलीवंदननिमित्त, तर त्यानंतर मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मोंढा व हळद मार्केट यार्डातील खरेदी - विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता ३ एप्रिलपासून मोंढ्यासह हळद मार्केट यार्डात शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार सुरळीत होणार आहेत. बारा दिवसानंतर शेतमाल खरेदी - विक्री होणार असल्याने संत नामदेव मार्केट यार्डात आदल्या दिवशी २ एप्रिल रोजी सकाळपासूनच हळदीची आवक होत होती. दुपारी २:०० वाजेपर्यंत मार्केट यार्ड आवारात जवळपास ६० वाहने हळद घेऊन दाखल झाली होती. यात हिंगोली जिल्ह्यासह यवतमाळ, वाशिम, रिसोड येथील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली आहे.